वाढोणा येथील सार्वजनिक सभागृहाजवळ अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:30 AM2021-04-09T04:30:35+5:302021-04-09T04:30:35+5:30
सावरगाव : नागभीड तालुक्यातील वाढोणा येथील गावाच्या सार्वजनिक सभागृहाशेजारील नवे व जुने बेकायदेशीर बांधकाम हटविण्यात यावे, अशी मागणी येथील ...
सावरगाव : नागभीड तालुक्यातील वाढोणा येथील गावाच्या सार्वजनिक सभागृहाशेजारील नवे व जुने बेकायदेशीर बांधकाम हटविण्यात यावे, अशी मागणी येथील हमारा गाव संघटनेने केली असून याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
येथे संपूर्ण गावासाठी एक सुंदर असे सार्वजनिक सभागृह बांधलेले आहे. या सभागृहासभोवताल मोकळी जागा आहे. या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून तीन लोकांनी बेकायदेशीररित्या बांधकाम केलेले आहे. सदर मोकळी जागा ही महसूल विभाग तथा ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येते. ही बाब माहीत असूनसुद्धा गावातील तीन व्यक्तींनी सदर जागेवर अतिक्रमण करून जागा बळकावली आहे व या जागेवर अवैधरित्या बांधकामसुद्धा केलेले आहे. सार्वजनिक सभागृह हा गावाच्या मुख्य रस्त्याला लागून आहे. मोकळी जागाही रस्त्याच्या कडेलाच आहे. येथे कुठल्याही शासकीय कार्यालयाचे बांधकाम केल्या जाऊ शकते किंवा इतर कुठल्याही शासकीय कामात ही जागा वापरली जाऊ शकते. दरम्यान, ही जागा शासनाच्या सोयीची असल्याने ग्रामपंचायतते वारंवार सदर व्यक्तींना अतिक्रमणे हटविण्याबाबत नोटीस बजावली होती. परंतु ग्रामपंचायतला न जुमानता सदर तीन व्यक्तींनी जबरदस्तीने या जागेवर बांधकाम केलेले आहे. दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाचा दबाव न राहिल्याने इतर नागरिकांनाही अवैधरित्या बांधकाम करण्याला वाव मिळेल. या बाबीची सखोल माहिती घ्यावी व मोका चौकशी करून सदर अवैधरित्या केलेले बांधकाम ग्रामपंचायतच्या ताब्यात द्यावे आणि संबंधित तिन्ही व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी हमारा गाव संघटनेने केली असून याबाबतचे निवेदन तहसीलदारांना संघटनेचे अध्यक्ष रूपेश डोर्लीकर तथा पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.