एक कोटीच्या शासकीय जागेवर अतिक्रमण

By admin | Published: May 27, 2015 11:58 PM2015-05-27T23:58:47+5:302015-05-27T23:58:47+5:30

राजुरा शहरातील सर्वे क्रमांक १४९ मध्ये शासकीय जमिनीची निव्वळ लूट चालू असून शासकीय अधिकाऱ्यांच्या .....

Encroachment on one crore government land | एक कोटीच्या शासकीय जागेवर अतिक्रमण

एक कोटीच्या शासकीय जागेवर अतिक्रमण

Next

तक्रारीनंतरही कारवाई नाही : तत्कालीन पालकमंत्र्यांच्या पत्राला जिल्हाधिकाऱ्यांकडून केराची टोपली
बी. यू. बोर्डेवार राजुरा
राजुरा शहरातील सर्वे क्रमांक १४९ मध्ये शासकीय जमिनीची निव्वळ लूट चालू असून शासकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे करोडोची जमीन अतिक्रमणाच्या विळख्यात जात आहे. विधायक कामासाठीसुद्धा जागा उपलब्ध होत नाही. शिवाजी नगरातील ५०० रुपये वर्गफूट किंमत असलेल्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण झाले असून जवळपास २० हजार फूट जागा ही खाजगी व्यक्तीनी अतिक्रमण करुन घरे बांधली आहे. नगर पालिकेने विकासाची कामे केली. सरकारी जागेवर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता काम करुन नगर पालिकेनेसुद्धा जमिनी अतिक्रमण करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले.
शिवाजी वॉर्डातील या २० गुंठे जागेची राजुरा येथील पंचशिल शिक्षण संस्थेने अनुसूचित जाती जमातींच्या मुलीसाठी वसतिगृह बांधण्यासाठी मागणी केली होती. त्यामुळे तहसीलदार यांच्या पत्रानुसार भूमी अभिलेख कार्यालयाने रक्कम भरुन मोजणी करुन दिली. नगर परिषद राजुरा आणि वन विभाग राजुरा यांनी ना हरकत प्रमाणपत्र दिले. शासकीय जमिनीची लोकहिताकरिता मागणी असूनदेखील वैयक्तिक लाभासाठी होत असलेल्या अतिक्रमणावर कोणतीच कारवाई शासन करीत नाही, ही मोठी शोकांतीका आहे. या संस्थेचे सर्व सोपस्कार आटोपून जिल्हाधिकारी कार्यालयात फाईल पोहोचतपर्यंत शिवाजी नगरातील या जागेवर अतिक्रमण सुरु झाले. या पंचशिल संस्थेने जानेवारी २०१३ मध्ये सर्वे क्रमांक १४९/ १ मधील मागणी केलेल्या २० गुंठे जागेवर अतिक्रमण होत असल्याचे प्रशासनाला लेखी कळविले. मात्र अतिक्रमण होत असताना नगर पालिका आणि शासकीय अधिकारी यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे सदर जागा अतिक्रमणधारकांनी बळकावली. याबाबत चंद्रपूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री तथा पर्यावरण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना ११ फेब्रुवारी २०१३ ला पत्र दिले. पंचशिल शिक्षण संस्था मुलींच्या वसतिगृहासाठी जागा मागत आहे. या संस्थेतर्फे वसतिगृह भाड्याच्या खोलीमध्ये आहे.
जागा मिळाल्यास या तालुक्यातील गरीब आदिवासींच्या मुलींना शिक्षणाच्या संधी उपलब्ध होईल. परंतु मंत्र्यांच्या पत्राला केराची टोपली जिल्हाधिकारी कार्यालयाने दाखविली आणि याबाबत कुठलाच निर्णय घेतला नाही. राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनीसुद्धा ११ जानेवारी २०१३ ला जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पत्र लिहून या संस्थेच्या लोकहिताच्या कार्यासाठी जागा उपलब्ध देण्याबाबत कळविले होते.
सर्व होत असताना राजुरा शहरात शिवाजी नगर वॉर्डातील या जागेवर अतिक्रमण सुरुच होते. राजुरा नगर पालिका आणि शासकीय अधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेतली असती तर ही एक करोडची शासकीय जमीन वाचू शकली असती. या संस्थेला जागा दिली असती तर गरिबांच्या शंभर मुली राजुऱ्याला शिक्षणासाठी राहिल्या असत्या. मात्र या जागेवर अतिक्रमण झाले. हे अतिक्रमण हटविण्याचे मोठे आव्हान आता प्रशासनासमोर आहे. या संदर्भात जबाबदारी झटकणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार कर्तव्यदक्ष आहेत. मग राजुराकडे लक्ष द्यावे व करोडोची शासकीय संपत्ती लुटणाऱ्या या टोळ्यावर नियंत्रण आणावे, शासकीय जमीन विकणाऱ्या एजंटावर लक्ष केंद्रीत करुन कारवाई करावी. दारूबंदीनंतर आता अतिक्रमणाचा ज्वलंत प्रश्न मुनगंटीवारांनी हाताळावा, अशी मागणी राजुरावासीयांनी केली आहे.

Web Title: Encroachment on one crore government land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.