चंद्रपूरकरांचे संपेना चिखलाचे भोग
By admin | Published: July 16, 2014 12:04 AM2014-07-16T00:04:32+5:302014-07-16T00:04:32+5:30
शहरात करोडो रुपये खर्चांची रस्त्याची कामे केली जात आहे. विलंबाने सुरू झालेल्या या कामांना आता पावसाने खीळ घातली आहे. शहरातील मुख्य मार्ग वगळता अंतर्गत रस्त्याची अवस्था अद्यापही बिकट आहे.
पावसामुळे कामे खोळंबली : नागरिकांच्या नशिबी मनस्तापच
चंद्रपूर: शहरात करोडो रुपये खर्चांची रस्त्याची कामे केली जात आहे. विलंबाने सुरू झालेल्या या कामांना आता पावसाने खीळ घातली आहे. शहरातील मुख्य मार्ग वगळता अंतर्गत रस्त्याची अवस्था अद्यापही बिकट आहे. काही ठिकाणी कामे अर्धवट झाली आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही चंद्रपूरकरांचे चिखलाचे भोग संपण्याची चिन्हे दिसत नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून जटपूरा गेट ते रामनगर, तेथून आंबेडकर कॉलेज व पुढे आकाशवाणी मार्गाच्या डांबरीकरणाची नागरिकांना प्रतीक्षा होती. त्याचे काम सुरूही झाले. मात्र रामनगर चौकाचे पुढे हे काम पोहचू शकले नाही. त्यापुढे काही अंतरावर खडीकरण करण्यात आले. मात्र मध्येच पाऊस सुरू झाल्याने कामाचा खोळंबा झाला आहे. त्यातच या भागातील काही लोकांनी रस्त्यावर अतिक्रमण करून काही प्रमाणात बांधकाम केले. अतिक्रमीत बांधकाम काढण्यास विरोध झाल्यामुळे काम पुढे सरकेनासे झाले आहे. परिणामी पहिल्याच पावसात या मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून या ठिकाणी दुचाकी वाहनांना अपघात होत आहे. यापेक्षाही भयावह स्थिती आकाशवाणी मार्गाची आहे. या मार्गावर प्रचंड मोठ-मोठे खड्डे पडले असून त्यात आता पाणी साचले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी मोठी कसरत करीत हा मार्गक्रमण करावे लागत आहे.
शहरातील शास्त्रीनगर, रेल्वेस्थानक परिसर, भिवापूर वॉर्ड यासह शहरातील विविध भागात रस्त्याची कामे करण्यात आलीत. यातील काही कामे अद्यापही अर्धवट आहेत, तर पूर्ण झालेल्या कामाचा दर्जा खालावला आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी हे रस्ते उखडले आहेत. स्थानिक गंजवॉर्डात भाजी बाजार परिसरातील रस्ते चिखलमय झाले आहेत. ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. मात्र या रस्त्यांचे अद्यापही डांबरीकरण करण्यात आलेले नाही. यासोबतच शहरातील अंतर्गत रस्त्यांची कामे पावसामुळे खोळंबली असल्याने नागरिकांना चिखलाचा सामना करावा लागत आहे. या पावसाळ्यात ही कामे पूर्ण होईल की नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. (प्रतिनिधी)