नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:25 AM2021-02-08T04:25:04+5:302021-02-08T04:25:04+5:30

तीर्थक्षेत्राचा विकास करावा भद्रावती : तालुक्यात अनेक धार्मिक ठिकाणे आहेत. दरम्यान देऊरवाडा येथे तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन येथील पायाभूत विकास ...

Endangering the health of citizens | नागरिकांचे आरोग्य धोक्यात

नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Next

तीर्थक्षेत्राचा विकास करावा

भद्रावती : तालुक्यात अनेक धार्मिक ठिकाणे आहेत. दरम्यान देऊरवाडा येथे तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन येथील पायाभूत विकास करावा, अशी मागणी भाविकांकडून व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी सुविधा पुरविण्यात आल्यास येथील पर्यटन विकास साधला जाईल.

गडचांदूरसाठी बससेवा सुरू करा

गोंडपिंपरी : येथून तोहोगावमार्गे गडचांदूरसाठी थेट बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या बससेवेमुळे कमी अंतरात व आर्थिक बचतीत प्रवाशांना प्रवास करता येईल. याचा लाभ गोंडपिपरी व राजुरा तालुक्यातील नागरिकांना होईल.

जागेचे पट्टे देण्याची मागणी

चंद्रपूर : शहरातील बहुतांश भाग हा नझुलच्या जागेवर वसला आहे. लाखो रुपयाचे घर असूनही पट्टे नसल्यामुळे येथील नागरिकांना शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. घरकुल योजनेंतर्गत अनेकांचे अर्ज स्वीकारण्यात आले. मात्र घराला पट्टा नसल्याने घराचे स्वप्न लांबले आहे.

मोकाट कुत्र्यांची चिमुरात दहशत

बल्लारपूर : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली असून, शहरातील विविध वॉर्डात मागील काही दिवसापासून हैदोस सुरू आहे़ रात्रीच्या सुमारास घराबाहेर पडल्यास कुत्र्यापासून सावध राहण्याची वेळ आली़. बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

धूर फवारणी करण्याची मागणी

वरोरा : शहरात डासांची उत्पत्ती वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. नगर परिषद प्रशासनाने डासांच्या बंदोबस्तासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. काही मोकळ्या भूखंडावर आजही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे याचाही धोका नागरिकांना आहे, याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

रस्त्यावर वाहन ठेवणाऱ्यांवर कारवाई

चंद्रपूर : निष्काळजीपणे रस्त्यावर वाहन ठेवून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या सहा वाहनचालकांवर पोलिसांनी शनिवारी रात्री कारवाई केली. यामध्ये बल्लारपूर पोलिसांनी तीन, ब्रह्मपुरी सहा तर वरोरा पोलिसांंनी एक वाहनचालकावर कलम भादंवि २८३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

सिंदेवाही : नवरगाव-रत्नापूर येथील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नवरगाव-रत्नापुरातील विद्युत पुरवठा वारंवर खंडित होतो. त्यामुळे नागरिकांना अंधारात राहावे लागते.

अवैध वाहतुकीला आळा घालावा

जिवती : तालुक्यातील ग्रामीण मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत आला. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. मागील आठवड्यात वाहनांची तपासणी करण्यात आली. मात्र, काही दिवसातच ही मोहीम थंड झाली. अवैध वाहतुकीला जोर आला आहे. याला तातडीने आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

नाली उपसा न झाल्याने डासांचा उच्छाद

भद्रावती : तालुक्यातील विविध गावामध्ये अनेक नाल्या तुंबलेल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडचण जात आहे. परिणामी, डासांचे प्रमाण वाढले असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन नाल्याचा उपसा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

बेरोजगार निराश

ब्रह्मपुरी : शासनातील विविध विभागामध्ये तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या नोकरी करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात हजारो विद्यार्थी पदवीधर होत आहेत. परंतु, कनिष्ठ पदे भरण्यासंदर्भात शासनाने भूमिका घेतली नाही. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले. युवक-युवतींमध्ये प्रचंड निराशा निर्माण झाली आहे. हाताला काम नसल्याने नाराज आहेत. त्यामुळे भरती प्रकिया राबवावी, अशी मागणी युवकांनी केली आहे.

माणिकगड किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी

गडचांदूर : माणिकगड किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. याठिकाणी परराज्यातील पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येत आहेत. परिसरालगत असलेल्या विष्णू मंदिर, शंकर देव मंदिर, बुद्ध लेणी, अंमलनाला धरण येथेही पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देत आहेत.

भारोसा घाटावर पुलाची निर्मिती करा

कोरपना : तालुक्यातील भारोसा घाटावरून तीर्थक्षेत्र वढा व जुगादला जाण्यासाठी पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. याठिकाणी पुलाची निर्मिती झाल्यास चंद्रपूर, कोरपना, वणी तालुक्यातील गावातील नागरिकांना जाण्या- येण्यासाठी तसेच भाविकांना कार्तिक पौर्णिमा व शिवरात्री उत्सवाला भाग घेण्यासाठी सोयीचे होईल. या पुलाच्या माध्यमातून वेळ व आर्थिक बचत होणार असल्याने पूल बांधण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रवासी निवारा बांधण्याची मागणी

चिमूर : शंकरपूर, ब्रह्मपुरी, कान्पा येथे जाण्यासाठी फाट्यावर यावे लागते. या फाट्यावर प्रवासी निवारा नसल्याने या परिसरातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना रस्त्यात राहून बसची वाट बघावी लागते. त्यामुळे या ठिकाणी प्रवासी निवाऱ्याची मागणी होत आहे.

कृउबासमध्ये गर्दी वाढली

चंद्रपूर : खरीपातील पीक निघाले आहे. दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे पीक ओले होण्याची भीती असल्यामुळे शेतकऱ्यांनी आता विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गर्दी करणे सुरू केले आहे.

थकबाकी द्यावी

चंद्रपूर : मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगारांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याची मागणी कामगार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगारांना सहावा वेतन आयोग पाच वर्ष उशिराने लागू करण्यात आला. दरम्यान, या कालखंडातील थकबाकी कामगारांना अद्याप देण्यात आली नाही, असा आरोप प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांनी केला. मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगारांना पूर्वी वर्षातून चार महिने काम मिळत होते. आता ते एक महिन्यावर आले. सरकारच्या धोरणामुळे या वर्षात फवारणीचे कामच सुरू झाले नाही. राज्यातील फवारणी कामगारांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी ४ कोटी ५ लाख ५९ हजार असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

Web Title: Endangering the health of citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.