गोवरीवासीयांचा संघर्ष संपेना !
By admin | Published: May 22, 2014 11:45 PM2014-05-22T23:45:09+5:302014-05-22T23:45:09+5:30
वेकोलिच्या कुशीत वसलेल्या गोवरीवासीयांना गेल्या ३० वर्षांपासून पुराचा फटका दरवर्षी बसतो. यात अनेक संसाराची पुराने वाताहत होऊन कुटुंब उघड्यावर येते. पै-पै जोडून उभा केलेला संसाराचा डोलारा
प्रकाश काळे - हरदोना
वेकोलिच्या कुशीत वसलेल्या गोवरीवासीयांना गेल्या ३० वर्षांपासून पुराचा फटका दरवर्षी बसतो. यात अनेक संसाराची पुराने वाताहत होऊन कुटुंब उघड्यावर येते. पै-पै जोडून उभा केलेला संसाराचा डोलारा क्षणार्धात पुराच्या पाण्यात वाहून जातो. पुराच्या पाण्यातून कुटुंब सावरताना होणारी धडपड नागरिकांच्या काळजाचा ठाव घेणारी असून गोवरीवासीयांचे हा संघर्ष ३० वर्षांनंतरही अजून कायम आहे. राजुरा तालुक्यापासून अवघ्या नऊ कि.मी. अंतरावर वेकोलिच्या कुशीत वसलेले गोवरी हे जेमतेम चार हजार लोकसंख्या असलेले गाव. गावाच्या सभोवताल असलेल्या कोळसा खाणी अगदी गावालगत आहे. सुसज्ज रस्ते गावाच्या विकासाचे प्रतिक मानले जाते. मात्र रस्ते चांगले असणे म्हणजे गावाचा परीपूर्ण विकास झाला, असे आपल्याला म्हणता येणार नाही. गोवरी गावाच्या सभोवताल वेकोलिची कोळसा खाण व मातीचे महाकाय ढिगारे आहेत. वेकोलिने कोळसा उत्खननानंतर मातीचे ढिगारे अगदी नाल्याच्या किनार्यावर टाकले आहे. वेकोलिने अनेक नाल्यांची दिशा वळविल्याने अल्पशा पावसाने नाल्याला पूर येतो. गोवरी गाव वेकोलिच्या कुशीत अगदी नाल्याच्या काठावर वसले आहे. त्यामुळे गावकर्यांना दरवर्षी पुराचा नाहक फटका बसून पै पै जोडून मोठ्या मेहनतीने उभा केलेला संसार उघड्यावर येतो. पुराच्या पाण्यातून कुटुंबाची सावरासावर करताना डोळ्यात अश्रू येतात. कुटुंब वाचविताना चाललेली धडपड जीवघेणेी असते. पुराच्या पाण्यातून कुटुंबाचा डोलारा सुरक्षित स्थळी हलविताना काळजाची होणारी तगमग गोवरीवासीय गेल्या ३० वर्षांपासून अनुभवत आहे. अनेक घरांची पुरात पडझड होऊन कुटुंब उघड्यावर येते. याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने येथील जाणकारांना विचारणा केली असता पूर्वी गोवरी परिसरातील गावांपेक्षा वेगळे होते. परिसरात कोळशाचे मोठ्या प्रमाणात साठे असल्याने वेकोलिने अगदी गावालगत कोळसा खाणी निर्माण केल्या. त्यामुळे कोळसा उत्खननासाठी शक्तीशाली ब्लॉस्टींगने नवीन इमारतींना अल्पावधीतच तडे जात आहे. वेकोलिने परिसरातील नाल्याची दिशा वळविल्याने अल्पशा पावसाने गोवरी गावात पाणी येते. मात्र गावकर्यांच्या हिताचे कोणतेही निर्णय वेकोलिने घेतले नाही. वेकोलिने गावकर्यांना आवश्यक सुविधा पुरविणे आवश्यक आहे. वेकोलिकडून गावकर्यांसाठी अनेक योजना आहेत. मात्र योजना कुठे गडप होतात कळायला मार्ग नाही. वेकोलिने वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा नफा कमवायचा आणि गावकर्यांनी आयुष्यभर वेकोलिच्या दुष्परिणामांना सामोरे जायचे, असा अलिखीत नियम बनला आहे. वेकोलिचे जबाबदार अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही.