इंग्रजी शाळा आरटीई प्रतिपूर्ती रकमेच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:27 AM2021-02-10T04:27:59+5:302021-02-10T04:27:59+5:30
नांदाफाटा : शासनाने २००९ पासून इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के बालकांचा मोफत प्रवेश सुरू केलेला आहे. मोफत प्रवेश ...
नांदाफाटा : शासनाने २००९ पासून इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के बालकांचा मोफत प्रवेश सुरू केलेला आहे. मोफत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क शासन शाळांना देत असते; मात्र २०१७ पासून आजतागायत अनेक शाळांना आरटीई प्रतिपूर्तीची रक्कम मिळाली नाही. यासंदर्भात आरटी फाउंडेशनद्वारा यावर्षी आरटीई प्रवेश करणार नसल्याचे सांगितले आहे.
मेस्टा, इसा, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद आदी संघटनांनी या मोहिमेला पाठिंबा दिला असून, जोपर्यंत आरटीई प्रतिकृतीची रक्कम शाळांना अदा होणार नाही, तोपर्यंत आरटीई प्रवेश देणार नाही, अशी भूमिका इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी घेतली आहे .जिल्ह्यातही आरटीई प्रतिपूर्तीसाठी यापूर्वीही अनेकदा शिक्षण संघटनांनी शासनाला निवेदने दिली. परंतु अजूनही रक्कम जमा झाली नसल्याचे अनेक शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. सध्या कोरोनामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळेचे शुल्क पालकांकडे बऱ्याच प्रमाणात प्रलंबित आहे. यातच शिक्षकांचे वेतन मूलभूत सुविधा आणि शाळा सुरू झाल्याने दैनंदिन येणारा खर्च याचा ताळमेळ बसवताना इंग्रजी माध्यमाच्या शाळांना बरीच काटकसर करावी लागत आहे. काही शाळांमध्ये गेल्या तीन ते चार महिन्यांपासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन झाले नसल्याचे दिसते. त्यामुळे आरटीई प्रतिपूर्तीची रक्कम शाळांना मिळाल्यास मोठा आर्थिक दिलासा मिळेल, असे बोलले जात आहे. तेव्हा शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी इंग्रजी माध्यमांच्या संस्थांकडून केली जात आहे.