सैनिकी शाळेच्या निर्मितीत योगदान देण्याचे सौभाग्य लाभल्याचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 05:00 AM2020-01-28T05:00:00+5:302020-01-28T05:00:00+5:30
सैनिकी शाळेच्या निर्मितीत योगदान देण्याचे सौभाग्य मला लाभले, ती सैनिकी शाळा देशातील अद्वितीय, अदभुत शाळा म्हणून लौकीकप्राप्त ठरावी, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असल्याचे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : देशभक्तीची भावना ही क्षणिक न ठेवता वर्षभर ही भावना मनात कायम ठेवत भारताच्या विकासाचा विचार पुढे नेण्याची आज नितांत आवश्यकता आहे. लालबहादुर शास्त्रीजींनी जय जवान जय किसानचा नारा दिला, अटलजींनी त्याला जय विज्ञान अशी जोड दिली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जय अनुसंधान अशी जोड त्याला दिली आहे. विविधतेने नटलेल्या आपल्या देशाचे संविधान फक्त अधिकारच शिकवत नाही तर कर्तव्यपरायणतासुध्दा शिकविते. ज्या सैनिकी शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्याचे सौभाग्य मला लाभले, सैनिकी शाळेच्या निर्मितीत योगदान देण्याचे सौभाग्य मला लाभले, ती सैनिकी शाळा देशातील अद्वितीय, अदभुत शाळा म्हणून लौकीकप्राप्त ठरावी, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असल्याचे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील सैनिकी शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सैनिकी शाळेचे प्राचार्य स्क्वाड्रन लिडर नरेशकुमार, उपप्राचार्य लेफ्टनंट जनरल अनमोल, चंद्रपूर मनपाचे सदस्य संजय कंचर्लावार, रवी आसवानी, प्रविण पडवेकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तिरंगा ध्वजाला व वीर जवानांना आदरांजली दिली. गणराज्य दिन चिरायु होवो, अशी भावना व्यक्त करत त्यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे व परेडचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले, जेव्हा विद्यार्थी परेडदरम्यान सोबत पुढे जात होते तेव्हा ऐक्याची भावना प्रदर्शित झाली.
कोणीही एकटा नव्हता. हे ऐक्य भारताची सर्वात मोठी शक्ती आहे. जगातल्या काही देशांना भारताची प्रगती आवडत नाही, ते भारतात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. मात्र भारताने वेळोवेळी त्यांना चौख उत्तर दिले आहे. ‘दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिये’ हे गीत विद्यार्थ्याने गायले. देशाचे रक्षण करण्यासाठी तळहातावर प्राण घेवून सीमेवर सैनिक तैनात आहे. या सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांनी देश रक्षणासाठी ‘दिल दिया है पढाई में ध्यान भी देंगे’ अशी भावना ठेवत आदर्श निर्माण करावा, असे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.