जनजागरण मेळाव्यातून अंधश्रद्धेवर प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:07 AM2017-12-20T00:07:50+5:302017-12-20T00:08:47+5:30
जिल्हा पोलीस प्रशासन, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, महसूल विभाग आणि लाठी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडपिपरी तालुक्यातील वेळगाव या आदिवासी बहुल गावात जनजागरण मेळावा पार पडला.
आॅनलाईन लोकमत
गोंडपिपरी : जिल्हा पोलीस प्रशासन, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, महसूल विभाग आणि लाठी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडपिपरी तालुक्यातील वेळगाव या आदिवासी बहुल गावात जनजागरण मेळावा पार पडला. या मेळाव्यात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून प्रबोधन करण्यात आले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकेर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख, नायब तहसीलदार किशोर येरणे, संवर्ग विकास अधिकारी यशवंत मोहितकर, ठाणेदार कुमारसिंह राठोड, अंनिसचे जिल्हा संघटक अनिल दहागावकर, जिल्हा सचिव धनंजय तावाडे, अंबिके, बोरकुटे, लाकडे, निलेश पाझारे, आरोग्य अधिकारी डॉ. विजय धात्रक, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी संजय नवले, पं. स. सभापती दीपक सातपुते, जि. प. सदस्य वैष्णवी बोडलावार, सरपंच किरण नागापूरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी वैज्ञानिक दृष्टीकोन आणि जादूटोणा विरोधी कायदा यावर चमत्कार भंडाफोड प्रात्यक्षिकातून नागरिकांचे प्रबोधन केले. भूत- तंत्र- मंत्र जादूटोणा, करणी, बुवाबाजी आदी अंधश्रद्धेपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. समाजविघातक अंधश्रद्धा व व्यसनांच्या नादी न लागता सकारात्मक जीवन जगावे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक नियती ठाकेर यांनी केले.
प्रास्ताविक ठाणेदार राठोड यांनी केले. संचालन व आभार सचिन फुलझेले यांनी केले. या मेळाव्यात विविध शासकीय योजनांचे स्टॉल्स लावून जनजागृती करण्यात आली. सोबतच सांस्कृतिक कार्यक्रम घेवून लोकनृत्य, आदिवासी नृत्य घेण्यात आले.