जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
By admin | Published: July 9, 2016 12:59 AM2016-07-09T00:59:53+5:302016-07-09T00:59:53+5:30
गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस शुक्रवारी दिवसभर कायम राहिला. जिल्ह्यातील सर्व भागात हा पाऊस झाला.
जलसाठ्यात वाढ : संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
चंद्रपूर : गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस शुक्रवारी दिवसभर कायम राहिला. जिल्ह्यातील सर्व भागात हा पाऊस झाला. या संततधार पावसाने शुक्रवारी जराही उसंत घेतली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, जिल्ह्यातील एकाही गावाचा संपर्क तुटल्याचे वृत्त नाही. आज दिवसभर जिल्ह्यात ७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. १ जूनपासून आतापर्यंत सरासरी ३५३.१६ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.
मागील सहा दिवसांपासून जिल्ह्यात अधेमधे पाऊस बरसत आहे. मात्र हा पाऊस अर्धा-एक तासच पडत असल्याने जलसाठ्यात पाहिजे तशी वाढ झालेली नाही. शिवाय जिल्ह्यातील काही भागात पाऊस पडला तर काही भाग कोरडाच राहत होता. दरम्यान, गुरुवारी दिवसभर पाऊस आला नाही. मात्र मागील सहा दिवस ढगाळ वातावरण कायम राहिले.
गुरुवारी मध्यरात्री २.३० वाजतापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. चंद्रपूरसह बल्लारपूर, राजुरा, कोरपना, जिवती, मूल, सावली, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, भद्रावती, वरोरा, चिमूर या सर्व तालुक्यात एकाचवेळी मध्यरात्रीच्या सुमारास पावसाला सुरुवात झाल्याची माहिती आहे. रात्रीपासून पडत असलेला पाऊस सकाळी थांबेल असे वाटत होते. मात्र शुक्रवारी सकाळपासूनच पावसाची झड कायम होती. दिवसभरही पावसाने उसंत घेतली नाही. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने जिल्हाभरात जवजीवनावर मोठा परिणाम झाला. नागरिकांना रेनकोट, छत्र्या घेऊनच बाहेर पडावे लागत होते. एरवी गजबजलेली चंद्रपूरची बाजारपेठ आज दिवसभर पावसाच्या झडीमुळे ग्राहकांअभावी ओस पडल्याचे दिसून येत होते.
सध्या जिल्ह्यात कापूस आणि धान पिकांच्या जवळपास ९० टक्के पेरण्या झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक भागात पावसाची उसंत नसल्याने पेरण्या खोळंबल्याचे दिसून येते. आजही दिवसभर पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना काहीच करता आले नाही. विशेष म्हणजे, ज्या शेतकऱ्यांच्या आधीच पेरण्या झाल्या आहेत, त्यांच्यासाठी आजचा पाऊस अत्यंत लाभदायक ठरला आहे. जमिनीत पाणी साठले की चिखल करता येणे शेतकऱ्यांना शक्य आहे. तसे झाले तर पुढील आठवड्यात धानपट्यात रोवणीच्या कामांनाही प्रारंभ होईल.
आतापर्यंत एकदाही दमदार पाऊस पडला नाही. त्यामुळे सोयाबीनच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. ३० ते ४० टक्केच सोयाबीनच्या पेरण्या होऊ शकल्या. मात्र आज जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस पडल्यामुळे सोयाबीन उत्पादकांना याचा चांगला फायदा होणार आहे. (शहर प्रतिनिधी)
शासनाच्या आकडेवारीमुळे संभ्रमावस्था
गुरुवारी जिल्ह्यात एकूण १३७.९ मिमी पावसाची नोंद झाली. म्हणजेच सरासरी ९.१९ मिमी पाऊस झाला. तर शुक्रवारी दिवसभर ७५ मिमी पाऊस पडल्याची माहिती आहे. शासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यात १ जूनपासून आजपर्यंत एकूण ५, २९७.५ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. म्हणजेच सरासरी ३५३.१६ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. मात्र शेतकरी आणि जाणकारांचे मते जिल्ह्यात आतापर्यंत ५२९७.५ मिमी पाऊस पडलाच नाही. त्यामुळे शासकीय आकडेवारीमुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
आठवडी बाजारांवर परिणाम
आज शुक्रवारी चिमूर, कोरपना यासह अनेक ठिकाणी आठवडी बाजार होता. सकाळपासून सुरू असलेला पाऊस नंतर थांबेल, अशी आशा असल्याने दुकानदारांनी नेहमीप्रमाणे आठवडी बाजारांसाठी तयारी केली. मात्र दिवसभर संततधार पाऊस सुरू असल्याने आठवडी बाजारांवरही परिणाम झाला. बाजारात ग्राहकांची गर्दीच नसल्याने आठवडी बाजारावर अवकाळा आल्याचे दिसून येत होते.
नदी-नाल्यांचा जलस्तर वाढला
मागील सहा दिवसात अधेमधे पाऊस पडत राहिला. मात्र पावसाच्या सरी दमदार नसल्याने नदी-नाल्यात व सिंचन प्रकल्पातील जलसाठा पाहिजे तसा वाढला नाही. मात्र गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी दिवसभर संततधार पाऊस पडल्याने नदी-नाल्यातील जलस्तर वाढला आहे. सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यातही बऱ्यापैकी वाढ झाली आहे.