कचऱ्याच्या आगीचा पर्यावरणाला धोका

By admin | Published: May 1, 2016 12:38 AM2016-05-01T00:38:50+5:302016-05-01T00:38:50+5:30

महानगरपालिकेच्या वतीने येथील बल्लारपूर मार्गावरील डम्पींग यार्डवर शहरातील घनकचरा टाकला जातो.

Environmental threat of trash fire | कचऱ्याच्या आगीचा पर्यावरणाला धोका

कचऱ्याच्या आगीचा पर्यावरणाला धोका

Next

महानगरपालिकेचे दुर्लक्ष : परिसरातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात
चंद्रपूर : महानगरपालिकेच्या वतीने येथील बल्लारपूर मार्गावरील डम्पींग यार्डवर शहरातील घनकचरा टाकला जातो. या कचऱ्याला वारंवार आग लागत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकल्पाला लागून असलेल्या अष्टभूजा वॉर्डातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. याबाबत ग्रीन प्लॅनेट सोसायटीने जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिले आहे.
चंद्रपूर- बल्लारपूर वळण मार्गावर महानगरपालिकेचा कचरा डेपो आहे. या घनकचरा प्रकल्पाला पूर्ण कंपाऊंड करण्यात आलेले नाही. परिणामी या कचऱ्यावर नेहमीच गायी, म्हशी, डुकरे, कुत्रे यांचा वावर असतो. त्यासोबतच बगळ्यांची (कॅटल इग्रेट) भटकंती येथे असते. या डम्पींग यार्डमधील काही पदार्थ हे प्राणी दूरवर नेत असतात. या परिसरात कुत्र्यांची संख्या मोठी आहे. कचरा डेपोच्या एका बाजूला शहर आणि दुसऱ्या बाजूने जंगल वेढलेले आहे. त्यामुळे बिबट्यासारखे प्राणी याकडे आकर्षित होतात. त्यामुळे भविष्यात या परिसरात मानव- वन्यजीव संघर्ष वाढण्याची शक्यता आहे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
या कचरा डेपोच्या पूर्व भागात एका नाला आहे. तो कचरा डेपोला लागूनच वाहतो. अशा स्थितीत या कचरा डेपोतून तयार होणारा अत्यंत धोकादायक लिचाट या नाल्यातील पाण्यासोबत वाहत जाते. पुढे ते झरपट नदीतून रामाळा तलावापर्यंत येते. वास्तविक पाहता अशा कचरा डेपोतील पाण्याचा निचरा कुठेच होऊ नये, यासाठी विशेष ड्रेनेजची व्यवस्था केली पाहिजे. ती केली नाही. या भागाातील भूगर्भातील पाणी दूषित झाले आहे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
तसेच या प्रकल्पात कचऱ्याचे विभक्तीकरण झालेले नाही. पुनर्वापर होऊ शकणारा कचरा, कंपोस्टेबल कचरा, बायोडिग्रेडेबल कचरा, घनकचरा, कॅटरर्सचे प्लास्टिक पदार्थ, हजार्डस, रासायनिक सेल, बॅटरीज अशा सर्व प्रकारच्या गोष्टी एकाच ठिकाणी वेगवेगळ्या ढिगाऱ्यात मिसळलेल्या असतात. ही बाब महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २००० चे मोठे उल्लंघन आहे, असा दावा ग्रीन प्लॅनेटने केला आहे. नियमाप्रमाणे या कचऱ्याचे पृथक्करण करावयास पाहिजे. प्रत्येक कचऱ्याला वेगवेगळ्या प्रक्रियेने नष्ट करावयास पाहिजे. परंतु असे कुठेच दिसून येत नाही. दररोजच्या कचऱ्यावर मातीचे थर टाकले जावे, असाही नियम आहे. मात्र यापैकी काहीच होत नाही.
या कचरा डेपोच्या बल्लारपूर- बायपास रस्त्याकडून कुणालाही या कचरा डेपोत जाता येते. मागील बाजू उघडीच आहे. खरे तर नियमानुसार या प्रवेशद्वारावर एक सुरक्षारक्षक असावा. शहरातील केटरर्स या डेपोत वाचलेले जेवण, प्लास्टिक सतत टाकत असतात.
खराब झालेल्या या जेवणातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येते. या कचरा डेपोतून अनेक दिवसांपासून धूर दिसत आहे. दररोजचा कचरा उघड्या वातावरणाच्या संपर्कात येणार नाही, यासाठी त्या कचऱ्यावर माती झाकून टाकावी, असे नगर विकास मंत्रालयाचे निर्देश आहेत. या निर्देशाचे पालन होताना दिसत नाही. सर्वत्र कचरा अगदी उघडा असतो. संपूर्ण कचरा डेपोत रस्त्याची निर्मिती करावी, जेणेकरुन कचरा एकाच ठिकाणी टाकला जाणार नाही, असेही निर्देश आहेत, या सर्वे निर्देशांची पायमल्ली होताना दिसून येते, असे ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे निवेदनात म्हटले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Environmental threat of trash fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.