५० बेड्स ऑक्सिजन पाइपलाइन टाकून सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:21 AM2021-05-29T04:21:57+5:302021-05-29T04:21:57+5:30
दोन शासकीय, तर पाच खासगी कोविड सेंटर : तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य विभाग लागले कामाला रवी रणदिवे ब्रह्मपुरी : आरोग्यधाम ...
दोन शासकीय, तर पाच खासगी कोविड सेंटर : तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य विभाग लागले कामाला
रवी रणदिवे
ब्रह्मपुरी : आरोग्यधाम म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले ब्रह्मपुरी कोरोनाच्या संसर्गामुळे हादरले. पहिल्या व दुसऱ्या लाटेचा सामना केलेला वैद्यकीय विभाग आता मात्र तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तत्पर आहे. ५० बेम्सला ऑक्सिजन पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. इतर अनेक वैद्यकीय सोयी-सुविधांची उपलब्धताही होत आहे. सध्या दोन शासकीय, तर पाच खासगी कोविड रुग्णालय कार्यरत आहे.
शहरातील नागरिक आता कोरोना संसर्गाबाबत जागृत होत आहेत. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट जरी आली तरी तिचा सामना करण्यासाठी वैद्यकीय विभाग तत्पर आहे.
कोरोनाचा सामना करण्यासाठी शासनाने लॉकडाऊनची सुरुवात २३ मार्च २०२० पासून केली. मात्र ब्रह्मपुरी व ब्रह्मपुरी तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण १६ मे २०२० रोजी खेड येथे मिळाला. त्यानंतर ब्रह्मपुरी तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. तालुक्यात पहिली लाट ४ जून २०२० पासून सुरू होऊन २५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत होती. ही पहिली लाट असल्यामुळे येथे वैद्यकीय सुविधा होती. फार कमी पॉझिटिव्ह रुग्णास सरळ चंद्रपूर अथवा नागपूर रेफर करावे लागत होते. या पहिल्या लाटेत मृत्यू पावलेल्यांमध्ये वृद्ध व्यक्तींचे प्रमाण अधिक होते.
बॉक्स
दुसऱ्या लाटेत असे वाढले रुग्ण
पहिल्या लाटेत एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १७३९ होते, तर मृत्यू अतिशय अल्प म्हणजे चार होते.
मात्र दुसऱ्या लाटेने भयावह स्थिती निर्माण केली. मृत्यूचे प्रमाण तर वाढलेच पण यात तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक होते. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढली. १ मार्च २०२१ पासून आतापर्यंत तीन हजार ३५९ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, तर आतापर्यंत ४१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
बॉक्स
नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती
या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाकडून नवीन कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांस स्थानिक पातळीवरच उपचाराच्या सोयी निर्माण झाल्या. ऑक्सिजन काँन्सेस्ट्रेटर, ऑक्सिजन सिलिंडर मिळाले, वाहने मिळाली. यामुळेच दुसऱ्या लाटेचा सामना करणे सहज शक्य झाले. सद्यस्थितीत सहा डॉक्टर, २३ अधिपरिचारिका, १६ परिचर, दोन तंत्रज्ज्ञ व एक फॉरमेमिस्ट सेवा देत आहेत.
सुविधांची उपलब्धता
संभाव्य तिसऱ्या लाटेचाही सामना करण्यासाठी आरोग्य विभाग तत्पर आहे.
बॉक्स
अशी आहे बेडची व्यवस्था
ब्रह्मपुरीचा विचार करता येथे शासकीय वसतिगृहात ७२ बेड्स व ऑक्सिजनचे १५ बेड्स आणि ७८ जम्बो ऑक्सिजन सिलिंडरची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. याशिवाय ५० बेड्सला ऑक्सिजनची पाइपलाइन जोडण्यात आली आहे. हे फक्त एका सेंटरची स्थिती आहे. अन्य सहा सेंटरवर जनरल बेड, ऑक्सिजन बेड, आईसीयू बेड व व्हेंटिलेटर बेड यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. कर्मचारीवर्गही पुरेसा आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट जरी आली तरी फार परिणाम जाणवणार नाही.
बॉक्स
ऑक्सिजन प्लांटचे काम सुरू
संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता ब्रह्मपुरी येथे ऑक्सिजन प्लांटचे काम ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात सुरू आहे. सध्या ब्रह्मपुरीला चंद्रपूर येथून ऑक्सिजनचा पुरवठा होतो. यात बराच वेळ आणि आर्थिक भार पडत आहे. हे नुकसान येत्या काही काळात पूर्ण टाळता येणार आहे. अवघ्या ४५ दिवसांत हे काम पूर्ण होणार आहे. तर याठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभे झाल्यास नागभीड, सिंदेवाही, चिमूर आदी तालुकेही चंद्रपूरऐवजी ब्रह्मपुरी येथून ऑक्सिजनची उचल करू शकतात.
बॉक्स
आतापर्यंत ४५ जणांचा मृत्यू
कोरोनामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील आतापर्यंत ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात पहिल्या लाटेत चार, तर दुसऱ्या लाटेत ४१ व्यक्तींचा समावेश आहे. मात्र अनेक कोरोनाबाधित व्यक्ती या नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली व अन्य ठिकाणी मृत पावल्या आहेत.
कोट
तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. ग्रामीण रुग्णालयात ५० बेड्सला ऑक्सिजन पाइपलाइन टाकण्यात आली आहे. तसेच तिसरी लाट थोपविण्यासाठी नवीन डॉक्टर, अधिपरिचरिका व परिचर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लसीकरण सुविधा निर्माण झाल्या आहेत. लोकही जागृत झाले आहेत.
- डॉ. सुभाष खिल्लारे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, ब्रह्मपुरी