सीबीएसई दहावीच्या इंग्रजी पेपरमध्येही चूक, प्रश्नाचे पर्यायच चुकीचे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 10:54 AM2023-02-28T10:54:30+5:302023-02-28T10:56:46+5:30
पहिल्याच पेपरने विद्यार्थी गोंधळले
चंद्रपूर : सीबीएसई दहावीचीपरीक्षा सोमवारपासून इंग्रजीच्या पेपरने सुरू झाली. पहिल्याच पेपरमधील एका प्रश्नाचे पर्यायच चुकीचे असल्याची बाब विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडविणारी ठरली. ‘मिस्टर किसींग हा व्यक्ती कोण होता?’ असा हा प्रश्न होता. तो गणित शिक्षक होता असे स्पष्ट उत्तर पाठ्यपुस्तकात आहे. मात्र प्रश्न पत्रिकेत हा पर्यायच नसल्याने विद्यार्थी चांगलेच बुचकळ्यात पडल्याचे परीक्षा केंद्राबाहेर दिसून आले.
सीबीएसईच्या दहावी परीक्षेतील इंग्रजी पेपरमध्ये सेक्शन ‘सी’च्या ‘लिटरेचर’वरील प्रश्नात ‘मिस्टर किसींग कोण होता? हा प्रश्न होता. त्याखाली इंग्रजी शिक्षक, सोशल सायन्स शिक्षक, वॉर्डन आणि प्रिंसिपल अशा चार पर्याय दिलेले होते. त्यातील एक पर्याय निवडायचा होता. वास्तविक इंग्रजी पाठ्यपुस्तकात तो गणित शिक्षक होता हे उत्तर आहे. मात्र पर्यायामध्ये हे उत्तरच नसल्याने परीक्षार्थी गोंधळले. गणित शिक्षक हा पर्यायच नसल्याने दिलेल्या पर्यायापैकी एक पर्याय काहींनी निवडला. मात्र तो पर्याय चुकलेला असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
याबाबत सीबीएसई शाळेच्या एका इंग्रजी शिक्षिकेला विचारले असता त्यांनी प्रश्नाखाली दिलेले पर्यायच चुकीचे असल्याचे ठासून सांगितले. या प्रश्नाला एक गुण होता. ज्यांनी तो प्रश्न सोडवला त्यांना गुण मिळायला हवे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. दरम्यान, बारावीच्या परीक्षेतही मोठी चूक उघडकीस आली होती. बोर्डाकडून त्याचे सहा गुण नंतर जाहीर करण्यात आले. त्यापाठोपाठ आता दहावीच्या परीक्षेतही अशी चूक जाहीर झाल्याने एकूण परीक्षेच्या यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.