वाजतगाजत गणरायाची प्रतिष्ठापणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:35 AM2019-09-03T00:35:03+5:302019-09-03T00:35:55+5:30
आज जिल्ह्यात सर्वत्र हेच चित्र दिसून आले. प्रतिष्ठापनेनंतर दहा दिवस गणेश भक्तीची आराधना सुरू राहणार आहे. उत्सवाच्या निमित्ताने सार्वजनिक गणेश मंडळांकडून कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. गणेशोत्सव हा एक सार्वजनिक उत्सव आहे. समाजामध्ये एकता असावी, उद्देशाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाचे दरवर्षीप्रमाणे यंदाही भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आगमन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील अनेक दिवसांपासून विघ्नहर्त्या बाप्पाच्या आगमनासाठी तयारीत असलेल्या गणेशभक्तांनी सोमवारी वाजतगाजत भक्तीभावाने प्रतिष्ठापणा केली. घरघुती गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी छोटा बाजार व हिंदी सिटी शाळेजवळील रस्ता दिवसभर गणेशभक्तांनी फुलला होता. आज जिल्ह्यात सर्वत्र हेच चित्र दिसून आले. प्रतिष्ठापनेनंतर दहा दिवस गणेश भक्तीची आराधना सुरू राहणार आहे. उत्सवाच्या निमित्ताने सार्वजनिक गणेश मंडळांकडून कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.
गणेशोत्सव हा एक सार्वजनिक उत्सव आहे. समाजामध्ये एकता असावी, उद्देशाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाचे दरवर्षीप्रमाणे यंदाही भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आगमन झाले. यंदाच्या उत्सवावर मंदीचे सावट असल्याची चर्चा असताना मागील अनेक दिवसांपासून मूर्तीकार मूर्ती घडविण्यात मग्न होते. दरम्यान, सोमवारी शहरातील विविध भागात गणेशमूर्र्तींची लहान दुकाने लावण्यात आली. चंद्रपूर मनपाकडून हिंदी सीटी शाळा ते रघुवंशी कॉम्प्लेक्सदरम्यानच्या मार्गावर गणेशमूर्र्तींच्या दुकानांसाठी मंडप उभारून देण्यात आले. सोमवारी सकाळपासूनच या ठिकाणी मूर्ती खरेदीसाठी भाविकांची झुंबड उडाल्याचे दिसून आले. हिंदी सिटी शाळेपासून जयंत टॉकीज मार्गापर्यंतचा रस्ता सर्व वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. रात्री साडेसात वाजेपर्यंत गणेश मूर्तीची खरेदी करण्यासाठी हिंदी सीटी हायस्कूलच्या मागे भक्तांची गर्दी कायम होती.
यंदा पर्यावरणपूरक देखाव्यांवर भर
बदलत्या काळानुसार उत्सवाच्या स्वरूपात परिवर्तन केले पाहिजे, या हेतूने सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदा विविध कार्यक्रमांचे नियोजन केले. चंद्रपूर मनपा, नगर परिषदांनी प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनी जागृतीपर देखावे सादर करणार आहेत. यंदा पर्यावरण संवर्धन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, महिला जागृती, व्यसनमुक्ती, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी, प्रदूषण व प्लास्टिकमुक्ती हा विषय मांडण्यात येणार आहे. त्यामुळे सामाजिक संदेश देणारे देखावे व अन्य कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे, अशी माहिती सार्वजनिक गणेश मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी दिली.
बंदोबस्तासाठी अतिरिक्त कुमक
सोमवारी रात्री उशीरापर्यंत जिल्ह्यात बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा झाली. दरम्यान कुठेही अनुचित घटना घडली नाही. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला. १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक व इतर रजाही रद्द करण्यात आल्या आहेत. बंदोबस्तासाठी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वात पाच उपविभागीय पोलीस अधिकारी, २१ पोलीस निरीक्षक, ११० सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, १ हजार ४०० पुरुष पोलीस कर्मचारी व ३११ अकरा महिला पोलीस कर्मचारी याव्यतिरीक्त ६०० पुरुष होमगार्ड, १०० महिला होमगार्ड जवानांनाही विविध ठिकाणी तैनात केले आहे.
मातीची मूर्ती घेतल्यास एक झाड मोफत
मातीची मूर्ती घेतल्यास चंद्रपुरातील आनंदमन परिवाराच्या वतीने भाविकांना एक झाड मोफत देण्यात आले. या उपक्रमाला शहरातील भाविकांना मोठा प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.
मूर्तींच्या किमतीत यंदा ३० टक्क्याने वाढ
यंदा गणेश मूर्ती बनविण्यासाठी लागणाºया विविध साहित्याच्या किंमती वाढल्या. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मूर्तींच्या किंमतीमध्ये ३० टक्क्याने वाढ झाली. सरकारने पीओपी मूर्तीवर बंदी घातली. त्यामुळे मातीच्या मूर्ती विकत घेण्याशिवाय गणेश भक्तांना पर्याय उरला नाही. सजावटीसाठी पीओपीच्या वस्तु विकत न घेण्याची मानसिकता तयार होऊ लागल्याने कागदी वस्तुंकडे बहुतांश भक्तांचा कल दिसून आला. शासनाने कुंभार समाजाला स्वस्त दरात माती मिळावी, यासाठी जाचक नियमांपासून सवलत देण्याची मागणी मूर्तीकारांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.