१८ दिवसानंतरही ‘तिकडे’ फिरकले नाहीत बहुसंख्य नागरिक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:29 AM2021-04-04T04:29:16+5:302021-04-04T04:29:16+5:30
१६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. तेव्हापासूनच पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट व ऑक्सफर्ड व अॅस्ट्राझेनकाने तयार केलेल्या कोव्हिशिल्ड ...
१६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. तेव्हापासूनच पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट व ऑक्सफर्ड व अॅस्ट्राझेनकाने तयार केलेल्या कोव्हिशिल्ड लसीचे डोस दिले जात आहेत. दरम्यान, सरकारने दुऱ्सया टप्प्यात हैदराबाद येथील भारत बायोटेक व आयएमसीआर निर्मित कोव्हॅक्सिन लसीचे पहिल्यांदाच ४ हजार ८०० डोस पाठविले. हीे लस २ ते ८ अंश सेल्शियस कोल्ड चेनमध्ये साठवून ठेवली जाते. केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करून चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सध्या एकच स्वतंत्र केंद्र सुरू करण्यात आले. १५ मार्चपासून लसीकरणाला सुरूवात झाली. मात्र, शुक्रवार (दि. २ एप्रिल) पर्यंत २९९ नागरिकांनीच कोव्हॅक्सिन लस घेतल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अहवालातून पुढे आली.
कोव्हॅक्सिन लसीकरणाला गती का नाही?
आतापर्यंत हेल्थ केअर वर्कर ५०, फ्रन्टलाईन वर्कर ११ आणि ६० वर्षे व ४५ वर्षांवरील सहव्याधी असणाऱ्या २३० जणांनी कोव्हॅक्सिन लस घेतली. कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांची संख्या व गती कोविशिल्ड घेणाऱ्यांच्या तुलनेत कमी असण्याचे कारण काय, असा प्रश्न काही नागरिकांनी ‘लोकमत’कडे विचारला आहे.
चंद्रपूर, ब्रह्मपुरीची लसीकरणात आघाडी
जिल्ह्यात आतापर्यंत कोविडशिल्डचे एक लाख १४ हजार ८४७ आणि कोव्हॅक्सिनचे २९९ अशा एकूण एक लाख १५ हजार १४६ जणांनी कोराना प्रतिबंधक लस घेतली. यामध्ये चंद्रपूर शहरातील २६ हजार ४४५ जणांचा समावेश आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील १० हजार ८९५ नागरिकांनी लस टोचून १५ तालुक्यातून आघाडी घेतली, तर जिवती तालुका मागे आहे.
कोट
कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन लसींची गुणवत्ता उच्च दर्जाचीच आहे. कोव्हॅक्सिन डोस घेणाऱ्यांचे प्रमाण सध्या कमी आहे. पण, यापुढे दोन्हीचेहीे लसीकरण निश्चितपणे वाढेल. यासाठी सोमवारपासून व्यापक जनजागृती व गावागावात दवंडी आदी मोहीम सुरू होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गैरसमजांपासून दूर राहून लस घ्यावी.
- राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प., चंद्रपूर