स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही ग्रामीण रस्त्यांचे भाग्य उजळेना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:29 AM2021-08-15T04:29:05+5:302021-08-15T04:29:05+5:30
गोवरी : रस्ते हे देशाच्या विकासाचे प्रतीक आहे. स्मार्ट रस्त्यांनी शहरे सजली असताना ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था ...
गोवरी : रस्ते हे देशाच्या विकासाचे प्रतीक आहे. स्मार्ट रस्त्यांनी शहरे सजली असताना ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांकडे गेल्या अनेक वर्षांपासून अद्याप कुणाचेही लक्ष गेले नाही. अनेक रस्ते अखेरच्या घटका मोजत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य व खड्डेच खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत. मात्र, स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही ग्रामीण भागातील रस्त्यांचे भाग्य उजळले नाही. हे ग्रामीण भागातील नागरिकांचे दुर्दैव आहे.
राजुरा तालुक्यातील गोवरी-पोवनी, पारधीगुडा-मंगी , भुरकुंडा(खु)-देवाडा-गडचांदूर फाटा, पाचगाव-खैरगुडा, पाचगाव-कैकाडीगुडा, कुळमेथे गुडा-कोटकागुडा, भुरकुंडा (बू)-देवाडा यासारख्या तालुक्यांतील बहुतांश रस्त्यांवर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य पसरलेले असते. यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रवाशांसह नागरिकांची ओरड होऊनही या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्षच होत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधी रस्त्याकडे लक्ष देत नसल्याने दिवसेंदिवस ग्रामीण भागातील रस्ते नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
140821\img-20210814-wa0028.jpg
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही ग्रामीण भागातील रस्त्यांचे भाग्य उजळेना....!