सवलतीनंतरही २१६ धनदांडग्यांनी थकविले ५ कोटी ५८ लाखांचे वीजबिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:27 AM2021-02-13T04:27:09+5:302021-02-13T04:27:09+5:30

राजेश मडावी चंद्रपूर : कोरोनाने सर्वसामान्य नागरिकांच्या उदरनिर्वाहाची साधने हिसकावली. अनेकांचे व्यवसाय बुडाले. लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योगांचेही नुकसान ...

Even after the concession, 216 financiers have exhausted the electricity bill of 5 crore 58 lakhs | सवलतीनंतरही २१६ धनदांडग्यांनी थकविले ५ कोटी ५८ लाखांचे वीजबिल

सवलतीनंतरही २१६ धनदांडग्यांनी थकविले ५ कोटी ५८ लाखांचे वीजबिल

googlenewsNext

राजेश मडावी

चंद्रपूर : कोरोनाने सर्वसामान्य नागरिकांच्या उदरनिर्वाहाची साधने हिसकावली. अनेकांचे व्यवसाय बुडाले. लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योगांचेही नुकसान झाले. अशा अत्यंत अस्वस्थ काळात वीज वितरण कंपनीने अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवला. त्यामुळे सामान्य ग्राहक स्वत:हून वीज बिल भरत आहेत. मात्र, बऱ्याच व्यवसायांची स्थिती पूर्वपदावर आली असताना एक लाखाहून जास्त रक्कम थकबाकी असलेल्या २१६ धनदांडग्यांनी बिल भरण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे धनदांडग्यांकडील ५ कोटी ५८ लाख ९३ हजारांची वसुली करण्यासाठी महावितरणने नोटिसा बजावल्या आहेत.

कोरोनाचा कहर सुरू असताना सर्व नागरिक रोजगार व्यवसायाअभावी घरीच होते. अडीच-तीन महिने संपूर्ण कुटुंब घरात अडकून राहणे, ही घटना अत्यंत तापदायक होती. मात्र वीज कंपनीने ग्राहकांना अखंड वीज पुरवठा केला. परिणामी, नागरिकांना घरात सुरक्षितपणे राहणे सुकर होऊ शकले. या काळात उद्योग व व्यवसायही बंद होते. अशा स्थितीत नियमित दर आकारणीनुसार वीज बिल भरणे अशक्यच ठरले असते. दरम्यान, वीज बिल माफ होण्याच्या अफवाही पसरल्या. परंतु, कुठलीही वीज बिल माफी मिळणार नाही, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केले. त्यामुळे सामान्य ग्राहक वीज बिल भरू लागले तर दुसरीकडे इन्स्टॉलमेंट पॉलिसी योजना लागू करूनही धनदांडग्या ग्राहकांनी वीज बिलाकडे पाठ फिरविली. आजमितीस जिल्ह्यातील २१६ श्रीमंत ग्राहकांकडे तब्बल ५ कोटी ५८ लाख ९३ हजारांचे वीज बिल थकीत आहे.

चंद्रपूर विभागात सर्वाधिक थकबाकी

चंद्रपूर विभागासह व मूल, सावली उपविभागात एक लाखाहून जास्त थकीत असलेल्या ग्राहकांची संख्या सर्वाधिक १३२ आहे. बल्लारपूर विभागातील गडचांदूर, गोंडपिपरी, जिवती, पोंभुर्णा, राजुरा उपविभागात ३५, वरोरा विभागातील चिमूर, भद्रावती ४९ ग्राहकांकडे एक लाखाहून अधिक वीज बिल थकीत आहे. या तीनही विभागाची एकूण थकबाकी ५ कोटी ५८ लाख ९३ हजार २२ रुपये एवढी आहे.

थकबाकीत व्यावसायिक नंबर एक

महावितरणच्या बल्लारपूर विभागांतर्गत शहरातील १६ ग्राहकांकडे ४७ लाख ५८ हजार ६३३ हजारांची वीज थकबाकी आहे. राजुरा, गोंडपिपरी प्रत्येकी ३, गडचांदूर ७, जिवती २, चंद्रपूर विभागात चंद्रपूर शहर २२, चंद्रपूर २०. चंद्रपूर उपविभाग ८१, मूल ३, सावली ५, वरोरा विभागातील चिमूर १२, भद्रावती १० व वरोरा येथील २७ वीज ग्राहकांकडे एक लाखाहून जास्त रक्कम थकबाकी आहे. हे सर्व ग्राहक धनदांडगे असून व्यावसायिक व वाणिज्यिक श्रेणीतील आहेत.

४९२ ग्राहकांकडे ५० हजारांहून जास्त रक्कम थकीत

बल्लारपूर, चंद्रपूर,वरोरा विभागात ५० हजारांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ग्राहकांची संख्या ४९२ आहे. या ग्राहकांकडे ३ कोटी ३३ लाख ६९ हजार ४६९ रक्कम थकीत आहे. थकबाकीदार ग्राहकांना नोटिसा दिल्या. मात्र, अजूनही वसुली झाली नाही. त्यामुळे धनदांडग्यांकडून वीज बिल वसूल करणे महावितरणसाठी मोठे आव्हान ठरले आहे.

कोट

उद्योग व वाणिज्यिक ग्राहकांसाठी इन्स्टॉलमेंट पॉलिसी योजना लागू आहे. मात्र, ग्राहकांनी याचा लाभ घेतला नाही. त्यामुळे या श्रेणीतील ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या. व्यापक हित लक्षात घेऊन थकीत बिल भरणा केला पाहिजे. अन्य ग्राहकांनी थकीत बिल भरून महावितरणला सहकार्य करावे. कृषिपंप वीज जोडणी धोरण २०२० चा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

-संध्या चिवंडे, अधीक्षक अभियंता, महावितरण चंद्रपूर मंडळ.

Web Title: Even after the concession, 216 financiers have exhausted the electricity bill of 5 crore 58 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.