आर्थिक वर्ष संपत आले तरी तांडा वस्तीचा निधी जिल्हास्तरावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:31 AM2021-03-01T04:31:12+5:302021-03-01T04:31:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोरपना : वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत २०१९-२०करिता चंद्रपूर जिल्ह्यात अनेक तांड्यातील विकासकामांकरिता शासनाने प्रशासकीय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत २०१९-२०करिता चंद्रपूर जिल्ह्यात अनेक तांड्यातील विकासकामांकरिता शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून, निधीही वितरीत केला आहे. मात्र, वर्ष उलटूनही अद्याप कामे पूर्ण झाली नसल्याने तांडा वस्तीतील लोकांच्या स्वप्नांना पाने पुसली जात आहेत.
दिनांक १८ मार्च २०२०च्या शासन निर्णयान्वये चंद्रपूर जिल्ह्यात वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत ७ कोटी ५५ लाख रुपयांच्या १०६ कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. राज्य शासनाकडून निधीही वितरीत करण्यात आला. मात्र, समाजकल्याण विभागाकडून अजूनही निधी पंचायत समिती व ग्रामपंचायतींना पोहोचला नसल्याने तांडावासी विकास योजनांच्या प्रतीक्षेतच आहेत.
कोरपना तालुक्यात बिबी, पिपर्डा, वनसडी, सोनुर्ली व परसोडा आदी गावांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. अजूनही निधी पंचायत समिती स्तरावर पोहोचला नाही. सन २०२०-२१ हे वित्तीय वर्ष संपत आले असून, सन २०१९-२० या मागील वित्तीय वर्षातील पैसे अजून ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा न झाल्याने ग्रामपंचायतीने कामे करायची की निधी जाऊ द्यायचा, हा प्रश्न ग्रामपंचायतींसमोर उभा आहे. पंचायत समिती व समाजकल्याण विभाग विकासकामांच्या बाबतीत दक्ष नसल्याने कामाला विलंब होत असल्याचे दिसून येते.
कोट
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी चंद्रपूर येथील सामाजिक न्याय विभागाकडे वारंवार विचारणा केली असता, या विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळतात. वसंतराव नाईक तांडा वस्तीचा निधी तत्काळ ग्रामपंचायतीकडे वर्ग करावा. जेणेकरून तांडा वस्तीच्या विकासकामांना गती देता येईल.
- ललिता गेडाम, सरपंच, ग्रामपंचायत, वनसडी.