लस घेऊनही अनेकांची नोंदणीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:31 AM2021-09-06T04:31:56+5:302021-09-06T04:31:56+5:30
सिंदेवाही : कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी वाढली होती. ऑनलाईन नोंदणी होत नाही म्हणून अनेकांनी केंद्रावर ...
सिंदेवाही : कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी वाढली होती. ऑनलाईन नोंदणी होत नाही म्हणून अनेकांनी केंद्रावर जाऊन लसीचा पहिला डोस घेतला होता. मात्र कोविड लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्याकडून काही लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंद झाली नाही. तर काही चुकीची माहिती समाविष्ट करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या चुकांमुळे लस घेतलेल्या नागरिकांची डोकेदुखी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमी व कोविड लसीकरण प्रमाणपत्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे कुठेही प्रवेश मिळवण्यासाठी लसीकरणाचे प्रमाणपत्र आवश्यक झाले आहे. मात्र तालुक्यातील काही नागरिकांनी लस घेऊनही त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काहींनी केंद्रावर जाऊन लसीचा डोस घेतला. मात्र लसीकरण केंद्रावर कर्मचाऱ्याकडून लस घेणाऱ्यांची योग्य माहिती ऑनलाइन समाविष्ट न झाल्याने लसीकरण प्रमाणपत्रावर त्रुटी दिसून येत आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे पहिला डोस घेऊनही काहींना पहिल्या डोसाचे प्रमाणपत्र मिळाले नाही. काहींच्या प्रमाणपत्रात विविध चुका असल्यामुळे अनेकांची डोकेदुखी वाढली आहे.