२२ एप्रिलपर्यंतचा आदेश असतानाही नाफेडची तूर खरेदी १६ पासूनच बंद
By admin | Published: April 21, 2017 12:53 AM2017-04-21T00:53:32+5:302017-04-21T00:53:32+5:30
मागील काही महिन्यांपासून वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडने तूर खरेदी सुरू केल्याने शेतकऱ्यांना ५०५० रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता.
वरोरा : मागील काही महिन्यांपासून वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडने तूर खरेदी सुरू केल्याने शेतकऱ्यांना ५०५० रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. नाफेडची तूर खरेदी २२ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिल्यानंतर मात्र वरोरा येथे नाफेडने तूर खरेदी १६ एप्रिलपासूनच बंद केल्याने शेतकरी चांगलेच संतप्त झाले. त्यामुळे गुरूवारी संतप्त शेतकऱ्यांनी नाफेडच्या कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेड मार्फत तूर खरेदी ५०५० रुपये प्रति क्विंटल दराने वरोरा येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये मागील तीन महिन्यापासून सुरू आहे. व्यापाऱ्याकडे तीन ते चार हजार रुपये प्रति क्विंटल तुरीला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडकडे तूर विकण्याकरीता पसंती दिली. परंतु, नाफेडची तूर खरेदी संथगतीने सुरू असल्याने अनेक शेतकरी नाफेडच्या लिस्टमध्ये वेटींगवर आहेत. असे असतानाही नाफेडमध्ये अधिक दर मिळत असल्याने शेतकरी तूर नाफेडकडे आणीत आहे. केंद्र शासनाने नाफेडच्या तूर खरेदीला २२ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिल्याने शेतकरी आनंदी झाला. परंतु वरोरा येथील नाफेडची तूर खरेदी १६ एप्रिलपासून अचानक बंद केली. आधी आलेल्या तुरीचे मोजणी व नवीन खरेदी नाफेड करणार नाही, असा हेका नाफेडच्या अधिकाऱ्यांनी धरल्याने मार्केट यार्डमध्ये नाफेडच्या कर्मचाऱ्यांना संतापाला समोरे जावे लागले. सभापती विशाल बदखल, संचालक दत्ता बोरेकर, देवानंद मोरे, किशोर भलमे यांनी शेतकऱ्यांना शांत केले. (तालुका प्रतिनिधी)
२१ व २२ एप्रिलला तूर विक्रीस आणावे
शासनाने नाफेडला तूर खरेदीची मुदत २२ एप्रिल पर्यंत वाढवून दिली आहे. त्यामुळे नाफेडला २२ एप्रिलपर्यंत तूर खरेदी करावीच लागेल. यामुळे शेतकऱ्यांनी वरोरा बाजार समितीमध्ये २२ एप्रिल पर्यंत नाफेडकडे तूर विक्रीस आणावे, असे आवाहन बाजार समितीचे सभापती विशाल बदखल यांनी केले आहे.
२२ एप्रिलपर्यंत तूर खरेदी सुरू राहणार
तूर खरेदीची मुदत २२ एप्रिलपर्यंत आहे. दोन दिवस सुट्टया असल्यामुळे खरेदी झाली नाही. दररोज दोनशे क्विंटल तूर खरेदी करण्यात येत आहे. २२ एप्रिल पर्यंत तूर खरेदी करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
- कुमार स्वामी, नाफेड अधिकारी.