निधी मंजूर होऊनही फर्निचरची खरेदी रेंगाळली
By admin | Published: June 8, 2016 12:49 AM2016-06-08T00:49:10+5:302016-06-08T00:49:10+5:30
चार महिन्यांपूर्वी स्मार्ट ग्रामपंचायत फंडातून दोन लाख रुपये फंड मंजूर करून फर्निचर खरेदीचा ठराव घेण्यात आला.
घुग्गुस ग्रामपंचायत : सदस्यांनी खाली बसून केला संताप व्यक्त
घुग्गुस : चार महिन्यांपूर्वी स्मार्ट ग्रामपंचायत फंडातून दोन लाख रुपये फंड मंजूर करून फर्निचर खरेदीचा ठराव घेण्यात आला. मात्र फर्निचरची खरेदी प्रक्रिया रेंगाळली आहे. कार्यालयातील फर्निचर, खुर्च्याची दयनीय स्थिती असून त्वरित फर्निचर खरेदी करावे, याकडे सरपंच, ग्राम विकास अधिकाऱ्यांचे वेळोवेळी लक्ष वेधून सुद्धा वेळकाढू धोरण राबविले. त्यामुळे सत्ताधारी सदस्यांनी मासिक सभेदरम्यान खाली बसून ग्रामविकास अधिकारी आणि सरपंचावर संताप व्यक्त केला.
घुग्घुस ग्रामपंचायत सप्टेंबर मध्ये झालेल्या निवडणुकीपूर्वी व सत्तांतरानंतरही या-ना त्या विषयावर गाजत आहे. सत्तांतरानंतर सर्वात पहिले ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या बदलीचा विषय, दिवाळी भेटीचे लिफाफे, पाणी समस्या तर सरपंच-ग्रामविकास अधिकारी तर कधी सरपंच-सत्ताधारी सदस्यांचा वाद प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आरोप प्रत्यारोपाने रंगला. ५ जानेवारीच्या खास सभेत बहुमताने ग्रा.प. निधीतून दोन लाख रुपये खर्चाचे फर्निचर खरेदीचा ठराव मंजूर करण्यात आला. वेळोेवेळी फर्निचर खरेदीबाबत स्मरण करुन देण्यात आले. मात्र चार महिने लोटूनही फर्निचर खरेदी झालेली नाही.
यावर सत्ताधारी सदस्यांनी एप्रिलच्या मासिक सभेत फर्निचर खरेदीबाबत विलंब होत असल्याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली. मे महिन्याच्या सभेपूर्वी फर्निचर कार्यालयात आणावे, अशी ताकीद दिली. तरीही याची दखल सरपंच व विकास अधिकाऱ्याने घेतली नाही. याबाबत ३० मे च्या मासिक सभेत तुटलेल्या खुर्चीवर बसण्यापेक्षा खाली बसून सभेचे कामकाज करून सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर सत्तारुढ सदस्यांनी संताप व्यक्त केला.
कार्यालयात असलेल्या खुर्च्या तुटलेल्या असल्याने सदस्यच नाही तर कार्यालयीन कामकाजाकरिता ये-जा करणाऱ्या नागरिकाकडून सुद्धा खुर्च्याची दुरवस्थेबाबत चर्चेचा विषय बनविला जात होता. ग्रामपंचायतच्या दुर्लक्षीत धोरणाचा सत्ताधारी सदस्यांनी कडाडून विरोध करण्यात आला. मात्र विरोधकांनी फर्निचर खरेदीचा मुद्दा उचलून धरण्यापेक्षा निष्क्रीय सरपंच, विकास अधिकाऱ्याची अप्रत्यक्षपणे बाजू घेतली. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सत्तारूढ सदस्यांना समजविण्याचा प्रयत्न केला व सत्ताधारी सदस्यांना खुर्चीचा मोह या मुद्दयावरुन एकमेकांवर आरोप आहेत. (वार्ताहर)