तीन वर्षांनंतरही बसस्थानकाचे काम अपूर्णच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:23 AM2021-07-25T04:23:42+5:302021-07-25T04:23:42+5:30
प्रवाशांची गैरसोय : सोयी-सुविधाही नाहीत भोजराज गोवर्धन मूल : प्रवाशांना प्रवास करीत असताना बसस्थानकावर थांबण्यासाठी मनोरंजन व बसण्याची मुबलक ...
प्रवाशांची गैरसोय : सोयी-सुविधाही नाहीत
भोजराज गोवर्धन
मूल : प्रवाशांना प्रवास करीत असताना बसस्थानकावर थांबण्यासाठी मनोरंजन व बसण्याची मुबलक व्यवस्था व्हावी, यासाठी मूल येथील बसस्थानकाचे पुनर्निर्माण केले जात आहे. १२ महिन्यात नवीन बसस्थानकाचे काम पूर्ण करून ते प्रवाशांच्या सेवेत एसटी महामंडळाकडे सुपूर्द करायचे होते. परंतु तीन वर्षे लोटले तरीही बसस्थानकाचे काम अद्यापही अपूर्णच आहे. शासनाने प्रवासावरील बंदी उठविल्याने बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी जमू लागली आहे. मात्र येथील दहा कोटींच्या बसस्थानकात प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी तसेच स्वच्छतागृहात पाण्याचा अभाव आहे.
मूल शहर विकास आराखड्यांतर्गत दहा कोटी रुपये खर्चून आधुनिक सोयी-सुविधायुक्त बसस्थानक तयार केले जात आहे. बसस्थानकाचे काम १२ महिन्यांत पूर्ण करून प्रवाशांच्या सेवेसाठी ते एसटी महामंडळाकडे सुपूर्द करण्यात येणार होते. या बसस्थानकात २४ तास मोफत इंटरनेट वायफाय सुविधेसह इतरही महत्त्वाच्या आधुनिक सोयी-सुविधा देण्यात येणार होत्या. मात्र तीन वर्षे लोटूनही कंत्राटदाराने काम पूर्ण केलेले नाही. आधुनिक सोयी-सुविधा तर सोडाच मूलभूत सोयीसुध्दा येथील बसस्थानकात नाहीत.
बॉक्स
शेकडो प्रवाशांसाठी केवळ एकच शौचालय
येथील बसस्थानकावर दररोज शेकडोने प्रवासी प्रवास करतात. नवीन बनविलेल्या आधुनिक बसस्थानकात केवळ एकच शौचालय बनविण्यात आल्याने प्रवाशांना शौचविधी करण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत आहे.
बॉक्स
चौकशी विभाग प्रवाशांमध्ये
करोडो रुपये खर्च करून तयार करण्यात येत असलेल्या बसस्थानकाचे काम अजूनही पूर्ण झालेले नसल्यामुळे येथील वाहतूक निरीक्षकांना रोज टेबल बेंच आणून प्रवाशांमध्ये चौकशी विभाग सुरू करावा लागत आहे, यामुळे वाहतूक निरीक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.