दोन वर्षे लोटूनही पशुपालकांना मिळाले नाही अनुदान !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 12:04 PM2024-11-20T12:04:19+5:302024-11-20T12:05:27+5:30

मनरेगाचा भोंगळ कारभार : गुरांसाठी बांधले गोठे; निधी केव्हा देणार?

Even after two years, livestock farmers did not get subsidy! | दोन वर्षे लोटूनही पशुपालकांना मिळाले नाही अनुदान !

Even after two years, livestock farmers did not get subsidy!

लोकमत न्यूज नेटवर्क 
चंद्रपूर :
गाय पालन योजनेअंतर्गत गाईचा गोठा बांधकामासाठी शासनस्तरावरून अनुदान मिळणार म्हणून पशुपालकांनी, दोन ते सहा गुरे असणाऱ्यानी दोन वर्षांपूर्वी गुरांसाठी गोठा मंजूर करून संपूर्ण बांधकाम केले; परंतु दोन वर्षांचा काल लोटून देखील गोठ्याचे पैसे मिळाले नाहीत. आता तुम्हीच सांगा साहेब, आम्हाला पैसे कधी मिळणार? अशी विचारणा लाभार्थी करीत आहेत.


दिवसेंदिवस शेती परवडत नसल्याने शासन म्हणते शेतीपूरक व्यवसाय करा. शेतीपूरक व्यवसाय केला तर त्याला शासनाकडून पैसे मिळत नसल्याचे लाभार्थ्यांकडून बोलले जात आहे. काही युवकांनी शासनाच्या दुधाळ जनावरांच्या योजनेचा लाभ घेत दुधाळ जनावरे घेतली. त्यांना बांधण्यासाठी निवारा नसल्यामुळे पंचायत समितीअंतर्गत सुरू असलेल्या मनरेगाच्या माध्यमातून पळसगाव येथील लाभार्थी यादव धोंगडे यांनी गोठा मंदिर करून त्याची बांधणीसुद्धा केली. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीमध्ये काही पीक नसल्यामुळे कर्जाची उचल करून त्या संपूर्ण गोठ्याचे बांधकाम केले. बांधकाम केल्याबरोबरच अनुदान मिळेल या आशेने संपूर्ण गोठ्याचे काम तत्काळ केले; पण दोन वर्षांचा काळ लोटून देखील संपूर्ण पैशाचा परतावा अद्यापही झालेला नाही. कार्यालयाच्या चकरा मारूनही अनुदानाचे पैसे मिळत नसल्याचे लाभार्थी त्रस्त झाले आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत असे लाभार्थी आहेत, ज्यांनी या योजनेअंतर्गत स्वखर्चाने गोठ्याचे बांधकाम केले. मात्र, अनुदान मिळाले नाही. 'सरकारी काम अन् दोन वर्षे थांब' अशी अवस्था लाभार्थ्यांची झाली आहे. गोठ्याच्या अनुदानाचे पैसे जर मिळत नसेल तर शासनाने ही योजना राबवू नये. जेणेकरून संबंधित लाभार्थ्यांना नाहक त्रास होणार नाही. असे लाभार्थीकडून बोलले जात आहे. संबंधित अधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन तत्काळ लाभार्थ्यांचे अनुदान खात्यात वर्ग करावे, अशी मागणी होत आहे.


जोडधंद्याला चालना देण्यासाठी अनुदान देणे आवश्यक
एकीकडे शेतीला जोडधंदा, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून योजना राबवल्या जातात. त्यात युवा शेतकरी दूध व्यवसायात पाऊल टाकल्यानंतर जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर आपला व्यवसाय उभा करतात. शासकीय योजनांचा आधार घेऊन गोठ्याचे बांधकाम केल्यानंतरही दोन वर्षे वाट पाहावी लागत असल्याने कुठेतरी योजनेत पारदर्शकता नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. गोठा बांधून दोन वर्षे झाल्यानंतरही पैसे मिळत नसेल तर या संपूर्ण योजना बंद केल्या तरी चालेल, असेल लाभार्थ्यांकडून बोलले जात आहे.


"गुरांचा गोठा बांधकाम करून दोन वर्षांचा काळ लोटला आहे. फक्त नऊ हजार रुपये संबंधितांकडून प्राप्त झाले आहेत; पण उर्वरित रक्कम अद्यापही दोन वर्षांपासून रखडली आहे. अनुदानाची वेळेत परतफेड होत नसल्याने पुढे एकही लाभार्थी गुरांच्या गोठ्याचा लाभ घेणार नसल्याचे स्पष्ट चित्र आहे." 
- ठकसेन धोंगडे, लाभार्थ्यांचा मुलगा

Web Title: Even after two years, livestock farmers did not get subsidy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.