विषुव दिन असतानाही नसणार दिवस-रात्र एकसमान, खगोल अभ्यासक सुरेश चोपणे यांचा दावा
By राजेश मडावी | Published: September 22, 2023 04:52 PM2023-09-22T16:52:44+5:302023-09-22T16:53:40+5:30
विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेण्याचे आवाहन
चंद्रपूर : दरवर्षी २१-२२ मार्च तसेच २२-२३ सप्टेंबर रोजी विषुव दिन असतो. याचा अर्थ सूर्य अगदी विषुववृत्तावर असतो; परंतु आपल्याकडे उत्तर गोलार्धात २३ सप्टेंबरला दिवस-रात्र समान नसते. पाठ्यपुस्तके व सर्वसामान्य माहितीप्रमाणे २३ सप्टेंबरला दिवस-रात्र समान असते, असे मानले जाते. मात्र, वैज्ञानिक दृष्टीने चुकीचे आहे, असा दावा चंद्रपूरचे खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी केला.
पृथ्वी सूर्याकडे २३.५ अंशाने कललेली असल्याने वर्षभर पृथ्वीच्या २३.५ अक्षांसावर उत्तर-दक्षिणेला दररोज जागा बदलताना दिसतो. सूर्याच्या कर्कवृत्तावरून मकर वृत्ताकडे जाण्याच्या भासमान मार्गाला दक्षिणायन आणि मकर ते कर्कवृत्ताकडे जाण्याचा मार्गाला उत्तरायण म्हटले जाते. दोन्ही मार्गक्रमणावेळी सूर्य २१-२२ मार्च आणि २२-२३ सप्टेंबरला दोनदा विषुववृत्त पार करीत असतो. त्या दिवसांना विषुव दिन-संपात दिन म्हटले जाते. २०२३ रोजी विषुव दिन २३ सप्टेंबरला दुपारी १२:२० वाजता आहे. आपण याच दिवशी दिवस-रात्र समान असते असे म्हणतो. पण, खगोल व भौगोलिकदृष्ट्या चुकीचे आहे, असा दावा प्रा. सुरेश चोपणे यांनी केला.
राज्यात केव्हा व असते कुठे दिवस-रात्र समान?
महाराष्ट्रात २८-३० सप्टेंबरला दिवस-रात्र समान असेल. २३ सप्टेंबरला राज्यात कुठेही दिवस-रात्र समान नसते. २३ ला मुंबई येथे १२.०४.३६ तासांचा दिवस व ११.५३.३४ तासांची रात्र असते. नागपूर येथे १२.०४.४१ तासांचा दिवस तर ११.५३.३३ तासाची रात्र, चंद्रपूर येथे १२.०४.३९ तासांचा दिवस, तर ११.५५.३३ तासांची रात्र, २८ सप्टेंबर रोजी नागपूर, अमरावती, वर्धा, अकोला, धुळे, जळगाव येथे दिवस-रात्र समान, २९ला मुंबई, पुणे, नाशिक, चंद्रपूर, सातारा, सोलापूर येथे दिवस-रात्र समान, ३० सप्टेंबर रोजी कोल्हापूर व रत्नागिरी येथे दिवस व रात्र समान राहणार आहे, अशी माहिती प्रा. चोपणे यांनी दिली.