शेजाऱ्याकडून वीज घेतली तरी दाखल होऊ शकतो चोरीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:32 AM2021-09-06T04:32:05+5:302021-09-06T04:32:05+5:30
चंद्रपूर : शेजाऱ्याकडून अनधिकृतपणे वीज घेतली तर ती चोरी ठरते. एवढेच नाही तर घरगुती वापराची वीज दुकानासाठी वापरली तरी ...
चंद्रपूर : शेजाऱ्याकडून अनधिकृतपणे वीज घेतली तर ती चोरी ठरते. एवढेच नाही तर घरगुती वापराची वीज दुकानासाठी वापरली तरी तो गुन्हा ठरतो. त्यामुळे ग्राहकांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे.
अनेकवेळा वीज देयके थकबाकी किंवा अन्य कारणांमुळे वीज वितरण कंपनी वीजपुरवठा खंडित करते. अशावेळी शेजाऱ्यांकडून वीजपुरवठा जोडून घेतला जातो. मात्र, हा प्रकार अंगलट येऊ शकतो. जिल्ह्यात यासाठी स्वतंत्र पथक असून त्यांच्याकडून कारवाई केली जाते.
वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यात असे अनेक प्रकरण दाखल झाली आहेत. यामध्ये आर्थिक दंडासह काहीवेळा पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. कारवाईपासून वाचण्यासाठी कुणीही वीज नियमांचे उल्लंघन करू नये. असे केल्यास भविष्यात आपल्यावरही कारवाई होऊ शकते.
बाॅक्स
चोरी कळवा, दंडातील १० टक्के रक्कम बक्षीस मिळवा
२००३ मध्ये विद्युत कायद्यामध्ये महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. वाढत्या वीज चोरीला आळा घालण्याकरिता वीज चोरी कळवा बक्षीस मिळवा, ही योजना हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत वीज चोरीची माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जातात. एवढेच नाही तर संबंधित वीज चोरांकडून वसूल करण्यात आलेल्या दंडातील १० टक्के रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते.
बाॅक्स
कायदा काय सांगतो?
विद्युत कायदा २००३ मधील कलम १२६ अंतर्गत एखाद्या ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला असेल आणि त्याने शेजाऱ्याकडून वीज घेतली असेल तर तो गुन्हा ठरतो. असे आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. ज्या कामासाठी वीज घेतली आहे, त्याचा वापर त्या कामासाठी न करता दुसऱ्या कामासाठी केला असेल तरीही कारवाई केली जाते.
कोट
शेजाऱ्याकडून वीज घेणे किंवा विजेचा वापर अन्य कारणांसाठी करणे गुन्हा आहे. वीज चोरीच्या गुन्ह्यात संबंधिताला शिक्षाही होऊ शकते. वीज चोरी पकडण्यासाठी स्वतंत्र पथक आहे.
-सुनील देशपांडे
मुख्य अभियंता, चंद्रपूर परिमंडल.