टीसी नसेल तरी मिळणार जिल्हा परिषद शाळांत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:32 AM2021-08-24T04:32:36+5:302021-08-24T04:32:36+5:30
चंद्रपूर : मागील दीड वर्षापासून कोरोना संकटामुळे पालकांचे आर्थिक बजेट बिघडले आहे. खासगी इंग्रजी शाळांची फी भरणे परवडत नसल्याने ...
चंद्रपूर : मागील दीड वर्षापासून कोरोना संकटामुळे पालकांचे आर्थिक बजेट बिघडले आहे. खासगी इंग्रजी शाळांची फी भरणे परवडत नसल्याने पालक या शाळांमधून टीसी काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, काही शाळा टीसी देण्याचे टाळत असल्याने पालकांचा नाईलाज होत आहे. पाल्यांची टीसी नसेल तरी बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियम २००९ नुसार कलम ४ नुसार वयानुरूप जिल्हा परिषद शाळांत मुलांना दाखल करता येणार आहे. यामुळे इंग्रजी शाळांची भी वसुलीच्या सक्तीपासून पालकांची सुटका होणार आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या हातचा रोजगार गेला आहे. त्यामुळे इंग्रजी शाळांत टाकून मुलांच्या भविष्याचे स्वप्न बघणाऱ्या अनेक पालकांची निराशा होत आहे. हातात पैसाच नसल्याने इंग्रजी शाळांची फी भरणे कठीण होत आहे. फी भरली नाही तर पाल्यांना शाळेतून काढून टाकेल, अशी भीती सध्या पालकांना आहे. मात्र, पालकांनी ही भीती न बाळगता बिनधास्त जिल्हा परिषद शाळांत पाल्यांना प्रवेश घेता येणार आहे. विशेष म्हणजे, टीसी नसेल तरीही विद्यार्थ्यांच्या वयानुसार त्या त्या वर्गात त्याला जिल्हा परिषद शाळा दाखल करून घेणार आहे.
बाॅक्स
मुख्याध्यापक करणार टीसीसाठी प्रयत्न
एखादी इंग्रजी शाळा मुलांची टीसी देत नसेल तरी जिल्हा परिषदेच्या ज्या शाळेत मुलांना दाखल करण्यात येईल, त्या शाळेचे मुख्याध्यापक इंग्रजी शाळांच्या व्यवस्थापनाकडे दाखल विद्यार्थ्यांची टीसी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे पालकांच्या डोक्यावरील ताण कमी होणार आहे.
बाॅक्स
जिल्हा परिषद शाळेला अच्छे दिन
कोरोना संकटामुळे जिल्हा परिषद शाळांना अच्छे दिन आले असून, मागील काही वर्षांच्या तुलनेमध्ये गावागावांतील शाळांत पटसंख्या वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांविना असलेल्या शाळांमध्ये सध्या पटसंख्या वाढत
असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
बाॅख्स
वयानुसार मिळणार प्रवेश
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियम २००९ नुसार कलम ४ नुसार वयानुरूप विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. मुलाच्या वयानुसार त्या-त्या वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे टीसी किंवा इतर कागदपत्रे नसतील तरीही वयानुसार त्याला शाळेत दाखल करून घेण्यात येणार आहे.
बाॅक्स
एकूण शाळा शासकीय शाळा -१६३७
खासगी अनुदानित -४८९
खासगी विनाअनुदानित -३७८
एकूण शाळा २५०४
कोट
आरटीई ॲक्टनुसार प्रत्येक बालकाला शिक्षणाचा अधिकार आहे. कोणतेही बालक शाळाबाह्य राहू नये यासाठी वयानुरूप शाळेत दाखल करून घेता येते. त्यामुळे टीसी नसेल तरी जवळच्या शाळेत पाल्यांना दाखल करून घेता येणार आहे.
-जे.डी. पोटे सदस्य, जिल्हा परिषद शिक्षण समिती
कोट
आरटीई ॲक्टनुसार प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे. कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. जिल्हा परिषद शाळा सर्वांसाठी खुली असून प्रत्येक विद्यार्थ्याचे आम्ही स्वागत करतो. विद्यार्थ्यांना वयानुसार त्या त्या वर्गात प्रवेश दिल्या जाईल.
- दीपेंद्र लोखंडे
शिक्षणाधिकारी, चंद्रपूर