पावसातही ऐतिहासिक दीक्षाभूमीकडे वळली भीमपाखरांची पावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2021 05:00 AM2021-10-17T05:00:00+5:302021-10-17T05:00:25+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १६ ऑक्टोबर १९५६ रोजी चंद्रपुरात धम्मदीक्षा दिली. या ऐतिहासिक सोहळ्याचे अनेक जण साक्षीदार आजही हयात आहेत. बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळे अनेक पिढ्यांना उजेडाची दिशा मिळाली, हा कृतज्ञभाव त्यांच्या चेहऱ्यावर आज दिसून आला. कोरोनापूर्वी आयोजन समितीतर्फे दोन दिवस प्रबोधनात्मक कार्यक्रमांची मेजवानी असायची. शहरात मिरवणूक काढल्या जायची.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : माणूस म्हणून जगण्याचा अधिकार न देणारा धर्म नाकारत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ रोजी समता व करुणेचा संदेश देणारा बौद्ध धर्म स्वीकारला. या स्मृतीला उजाळा देण्यासाठी हजारो बौद्ध उपासक दरवर्षी चंद्रपुरातील दीक्षाभूमीवर येऊन समतेचा जागर करतात. शनिवारी पाऊस सुरू असतानाही भीमपाखरांची पावले दीक्षाभूमीकडे वळली. धम्मक्रांतीचा यंदाचा ६५ वा प्रवर्तन दिन सोहळाही साधेपणात साजरा करण्यात आला. कोविड नियमांचे पालन करून बौद्ध आंबेडकरी अनुयायांनी ऊर्जाभूमीवर दाखल होऊन तथागत बुद्ध व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १६ ऑक्टोबर १९५६ रोजी चंद्रपुरात धम्मदीक्षा दिली. या ऐतिहासिक सोहळ्याचे अनेक जण साक्षीदार आजही हयात आहेत. बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळे अनेक पिढ्यांना उजेडाची दिशा मिळाली, हा कृतज्ञभाव त्यांच्या चेहऱ्यावर आज दिसून आला. कोरोनापूर्वी आयोजन समितीतर्फे दोन दिवस प्रबोधनात्मक कार्यक्रमांची मेजवानी असायची. शहरात मिरवणूक काढल्या जायची. या सोहळ्याला जपान, थायलंड, श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश, तिबेट अशा जगभरातील भिक्षूंसह विद्वान बौद्ध प्रतिनिधींचा सहभाग असायचा. कोरोनामुळे दोन वर्षांपासून मुख्य सोहळ्यासह सर्वच कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे पंचशील ध्वज, डोक्याला निळ्या पट्ट्या, पांढरा पोशाख, हातात मशाल व उरात भरलेला प्रचंड आत्मविश्वास घेऊन जिल्ह्याच्या खेड्यापाड्यातून येणाऱ्या आंबेडकर अनुयायांवर मर्यादा आल्या. कोविड नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी पोलीस बंदोबस्त होता.
समता सैनिक दलाची मानवंदना
धम्मक्रांतीच्या ऐतिहासिक घटनेचे स्मरण करण्यासाठी समता सैनिक दलाच्या पथकाने दुपार दीड वाजेच्या सुमारास मानवंदना दिली. सायंकाळी थोडी गर्दी दिसून आली. मात्र, बहुतांश नागरिक शहरातीलच असल्याचे दिसून आले. भीमसैनिकांचे जथे तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले.
पुस्तकांचे स्टॉल्स नसल्याची रुखरुख
दरवर्षी दीक्षाभूमी परिसरात उभारण्यात आलेल्या पुस्तकांच्या दुकानांवर आंबेडकरी अनुयायांची प्रचंड गर्दी उसळायची. महापुरुषांच्या मूर्तींचे आणि क्रांतीचा संदेश देणाऱ्या भीमगीतांच्या सीडी स्टॉलही गर्दीने फुलून जायचा. कोरोनामुळे दोन वर्षांपासून हे सारेच प्रेरणादायी दृश्य दुर्मीळ झाले. कोरोना प्रतिबंधाचे पालन करून विचारांचे ठेवा असलेल्या पुस्तक विक्रीसाठी तरी प्रशासनाने परवानगी द्यायला हवी होती, अपेक्षा युवकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.