ध्येयवेड्या राहुलच्या जिद्द व प्रयत्नांपुढे संकटाचे आकाशही पांगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:23 AM2021-05-30T04:23:07+5:302021-05-30T04:23:07+5:30

समाजाचे ऋणानुबंध जोपासत - गृहउद्योगातून शोधला उदरनिर्वाहाचा मार्ग पॉझिटिव्ह स्टोरी वेदांत मेहरकुळे गोंडपिपरी : तालुक्यातील एका ध्येयवेड्या तरुणाने जिद्द ...

Even the sky of crisis is shattered by the perseverance and efforts of the heroic Rahul | ध्येयवेड्या राहुलच्या जिद्द व प्रयत्नांपुढे संकटाचे आकाशही पांगळे

ध्येयवेड्या राहुलच्या जिद्द व प्रयत्नांपुढे संकटाचे आकाशही पांगळे

Next

समाजाचे ऋणानुबंध जोपासत - गृहउद्योगातून शोधला उदरनिर्वाहाचा मार्ग

पॉझिटिव्ह स्टोरी

वेदांत मेहरकुळे

गोंडपिपरी : तालुक्यातील एका ध्येयवेड्या तरुणाने जिद्द व प्रयत्नातून टाळेबंदी काळात दैनंदिन व्यवसाय बंद असल्याने हताश न होता गृह उद्योगातून उदरनिर्वाहाचा मार्ग शोधला. वर्षांनुवर्षे करीत असलेल्या सामाजिक दायित्वाची जोपासनाही केली. त्याच्या या कार्याचे सर्व स्तरावरून कौतुक आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथील राहुल मुरलीधर सोनटक्के असे या तरुणाचे नाव आहे. इयत्ता दहावीच्या शिक्षणानंतर त्याने औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातून डिझेल मेकॅनिकचे व्यवसाय प्रशिक्षण घेतले. यानंतर तो मुंबई येथे एका खासगी कंपनीत काम करीत असताना त्याची काही सामाजिक कार्यकर्त्यांशी भेट झाली. येथूनच समाज कार्यही करायला लागला. अशातच हलाखीचे जीवन जगत असलेले त्याचे वडील मुरलीधर सोनटक्के यांच्या निधनानंतर राहुल परत स्वगावी आला. लहान भावाची जबाबदारी आणि अल्पशेती सांभाळत त्याने वढोली येथे गॅस वेल्डिंग, दुचाकी दुरुस्त व डेंटिंग पेंटिंगचा व्यवसाय थाटला. भावंडानेही त्याला हातभार लावत विविध व्यवसाय सुरू केले. राहुलचा विवाह झाला. त्याला पुत्ररत्न प्राप्त झाले. अगदी सुरळीत जीवनचर्या सुरू असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी टाळेबंदी झाली आणि राहुलचा हातचा व्यवसाय बंद पडला. हाती दमडी नाही व रोजगारही बंद अशा स्थितीत हताश न होता पत्नी सुलोचनाच्या मदतीने गृहउद्योग सुरू केला. प्रथम विविध प्रकारचा नाश्ता तयार करून तो दुचाकीवर फिरून विकू लागला. नंतर त्याने या वस्तू पाकिटबंद करून विकणे सुरू केले. राहुलने उन वारा पाऊस याची जराही तमा न बाळगता जिद्द व चिकाटीच्या बळावर व्यवसायात वृद्धी करीत उदरनिर्वाहाचा मार्ग शोधला. यासोबतच राहुलने गावागावातून वापरलेले कपडे व इतर साहित्य गोळा करून ते गरजूंपर्यंत पोहचविण्याचे कार्यही सुरूच ठेवले. राहुल व त्याची अर्धांगिनी सुलोचना यांनी रुचीगंगा प्रतिष्ठानची स्थापना करून शिवणकलेचे कौशल्य शिकवण्याचे काम सुरू केले. कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र बेरोजगारीने थैमान घातले असताना स्वकर्तृत्वातून राहुलने जिद्द व प्रयत्नांच्या भरवशावर संकटाच्या काळात हताश न होता स्वयंरोजगारातून उदरनिर्वाहाचा मार्ग शोधला. त्याचे हे कार्य सर्वांना प्रेरणादायी ठरत आहे.

Web Title: Even the sky of crisis is shattered by the perseverance and efforts of the heroic Rahul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.