हवा आली तरी गावात होतो अंधार
By Admin | Published: May 5, 2017 12:52 AM2017-05-05T00:52:28+5:302017-05-05T00:52:28+5:30
सध्या एकविसावे शतक आहे. विज्ञानानेही बरीच प्रगती केली आहे. लोकांचे जीवनमान सुकर व्हावे म्हणून वैज्ञानिकांनीही मागील
घोडपेठ : सध्या एकविसावे शतक आहे. विज्ञानानेही बरीच प्रगती केली आहे. लोकांचे जीवनमान सुकर व्हावे म्हणून वैज्ञानिकांनीही मागील शतकातच विजेचा शोध लावला होता. मात्र महावितरणच्या कारभारामुळे हा शोध लागूनही लोकांच्या अडचणी दूर झालेल्या नाही. साधी हवा आली तरीही घोडपेठ व परिसरातील वीज जात असून लोकांना रात्रीही विजेशिवायच जगावे लागत आहे.
मे महिन्याला नुकतीच सुरूवात झालेली आहे. उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. प्रचंड तापमानामुळे दिवसा लोकांनी घराबाहेर पडणेही बंद केले आहे. त्यातच उकाड्यामुळे हैराण झालेल्या लोकांना महावितरणने आपली किमया दाखविणे सुरू केले आहे. मागील दोन तिन दिवसांत वातावरणात कमालीचा फरक पडला आहे. त्यामुळे वारा जरी आला तरी वीज जाण्याचा प्रकार सध्या घोडपेठ व परिसरात सुरू आहे. आताच ही परिस्थिती आहे तर पावसाळ्यात काय होणार या विचारांनी अनेकांच्या मेंदुला झिणझिण्या येत आहेत. या प्रकारामुळे सामान्य नागरिकांसोबतच उन्हाळ्यात सर्वाधिक विक्री होणारी शितपेयांची दुकाने, झेरॉक्स, आटाचक्की व इतरही व्यवसायांवर मंदी आल्याचे जाणवत आहे. विजेच्या अभावामुळे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याच्या वेळेत तफावत होवून महिलांनासुध्दा त्रास सहन करावा लागत आहे.