अखेर मोन्टफोर्ट शाळेचे व्यवस्थापन नमले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:34 AM2021-07-07T04:34:43+5:302021-07-07T04:34:43+5:30
बामणी : येथील मोन्टफोर्ट शाळेने मागील वर्षीची थकीत फी असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गातून बाहेर केले होते. यावर शाळेतील पालक ...
बामणी : येथील मोन्टफोर्ट शाळेने मागील वर्षीची थकीत फी असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गातून बाहेर केले होते. यावर शाळेतील पालक संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेत शिक्षण विभाग, जिल्हाधिकारी व स्थानिक पोलीस ठाण्यात मोन्टफोर्ट शाळा व्यवस्थानाविरोधात निवेदन दिले. प्रशासनाचा दबाव बघता शाळा समितीने तत्काळ विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गात परत समाविष्ट केले.
मोन्टफोर्ट व्यवस्थापन व पालक संघर्ष समितीत मागील दोन वर्षांपासून वाद सुरू आहे. कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेला. सर्वांचेच आर्थिक गणित बिघडले. त्यामुळे वार्षिक फी कमी करावी यासाठी पालक संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या थकीत फीचा दाखला देत शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गातून बाहेर केले होते. यावर भाजप कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश महासचिव अजय दुबे यांच्या पुढाकाराने मोन्टफोर्ट पालक संघर्ष समिती व प्रशासकीय अधिकारी तहसीलदार संजय राइंचवार यांच्या अध्यक्षतेमध्ये व जि. प. सदस्य ॲड. हरीश गेडाम, बीडीओ धनकवडे, बामणी ग्रामपंचायत सरपंच सुभाष ताजने, गट शिक्षणाधिकारी वर्षा फुलझेले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत मोन्टफोर्ट शाळेचे प्राचार्य ब्रदर एंथोनी यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गातून बाहेर केल्याबद्दल खेद व्यक्त केला. विद्यार्थ्यांना लगेच ऑनलाइन वर्गात समाविष्ट करण्याचे आदेश दिले. पुढे कुठलाही निर्णय शिक्षक-पालक समितीच्या संमती शिवाय घेऊ नये अशी तंबी दिली. शाळेत पालक शिक्षक समितीच्या सभासदांचे फलक लावण्यात यावा, जे पालक फी भरण्यात असमर्थ आहे त्यांना काही प्रमाणात फीमध्ये सूट देण्यात यावी, शाळा प्रशासन व पालक-शिक्षक समितीची बैठक गट शिक्षणाधिकारी वर्षा फुलझेले यांच्या उपस्थितीत होईल असे ठरविण्यात आले. बैठकीत पालक संघर्ष समितीचे पदाधिकारी, उपसरपंच शेख जमील, कैलाश गुप्ता, भाजयुमो विद्यार्थी आघाडी जिल्हा महामंत्री प्रतीक बारसागड़े, अशोक सोनकर, मनीष रामिल्ला, रिंकू गुप्ता, श्रीकांत उपाध्याय तसेच पालक उपस्थित होते.