अखेर बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलाची प्रलंबित मागणी पूर्ण
By admin | Published: March 11, 2017 12:43 AM2017-03-11T00:43:54+5:302017-03-11T00:43:54+5:30
राज्याचे वित्तमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने शहरातील बाबुपेठ परिसरातील रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामाची बहुप्रतीक्षित मागणी अखेर पूर्ण होत आहे.
आज भूमिपूजन : सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार
चंद्रपूर : राज्याचे वित्तमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने शहरातील बाबुपेठ परिसरातील रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामाची बहुप्रतीक्षित मागणी अखेर पूर्ण होत आहे. या उड्डाण पुलाच्या बांधकामांचे भूमिपूजन आणि बाबुपेठ परिसरातील नवीन स्टेडियमच्या बांधकामाचे भूमिपूजन शनिवारी करण्यात येत आहे.
शहरातील बाबुपेठ परिसरातील रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. उड्डाण पुलाअभावी परिसरातील रेल्वे फाटकाजवळ होणारी वाहतुकीची कोंडी या परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली होती. या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी अनेक आंदोलनेसुध्दा केली.
याबाबत विद्यमान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २००२ मध्ये विधानसभेत अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. त्यानंतर विरोधी पक्षात असताना मुनगंटीवार यांनी या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला होता.
दोन वर्षांपूर्वी भाजपाचे स्थापन झाल्यानंतर वित्तमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर मुनगंटीवार यांनी या रेल्वे उड्डाण पुलाचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ना. मुनगंटीवार यांनी ६१ कोटी रुपये या पुलासाठी उपलब्ध करून दिले आहेत. त्याकरिता ना. मुनगंटीवार यांनी विधानभवन, मुंबई येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीत सदर रेल्वे उडडाण पुलाची निविदा एक महिन्यात प्रसिध्द करण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. चंद्रपूरचे आमदार नाना शामकुळे यांनी सुध्दा या मागणीचा सातत्याने पत्रव्यवहार व विधानसभेच्या माध्यमातून पाठपुरावा केला आहे.
बाबुपेठ परिसरातील भारतरत्न डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम निसर्ग उद्यानाच्या लोकार्पण सोहळयात ना. मुनगंटीवार यांनी बाबुपेठ परिसरात नवीन स्टेडियमचे बांधकाम करण्याबाबत नागरिकांना आश्वासन दिले होते. या आश्वासनांची पूर्तता करीत त्यांनी स्टेडियम बांधकामासाठी ४ कोटी २० लाखांचा निधी मंजूर केला आहे. या नवीन स्टेडियमच्या बांधकामाचे भूमिपूजनही शनिवारी होत आहे. (प्रतिनिधी)