अखेर सायन्स पार्क, आझाद बगिचा मार्गी
By admin | Published: July 16, 2016 01:04 AM2016-07-16T01:04:45+5:302016-07-16T01:04:45+5:30
गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी सदस्यांच्या आक्षेपामुळे रखडलेल्या रामाळा तलाव बगिचातील सायन्स पार्कची ....
स्थायी समिती : सत्ताधारी सदस्यांचा बगिचा विकासावर आक्षेप
चंद्रपूर : गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी सदस्यांच्या आक्षेपामुळे रखडलेल्या रामाळा तलाव बगिचातील सायन्स पार्कची निविदा स्थायी समितीने शुक्रवारी मंजूर केली. तसेच आझाद बगिचाचे विद्युतीकरण व विकास करण्याचाही निर्णय घेण्यात आला. मात्र, सत्ताधारी सदस्यांनी शहरात अनेक समस्या कायम असताना आझाद बगिचाचा विकास कशाला करता, असा आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी रमाई घरकूल योजनेचा निधी खर्च होत नसल्याबाबत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
यापूर्वीच रामाळा तलाव येथील बगिचामध्ये सायन्स पार्क उभारण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशाकीय मंजुरी दिली आहे. सायन्स पार्कच्या उभारणीकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये सर्वात कमी ४.८१ टक्के एवढ्या कमी दराची निविदा मे. एस. व्ही. एम. कंस्ट्रक्शनने भरली होती. मनपाच्या स्थायीे समितीच्या सभेत हा विषय शुक्रवारी चर्चेला आला.
रामाळा तलावाची देखभाल जिल्हाधिकाऱ्यामार्फत सिंचन विभाग करतो. आता या तलावात सायन्स पार्क उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी ९३.६८ लाख रुपये किंमतीच्या कामाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. सायन्स पार्क उभारणीकरिता ९३ लाख ६८ हजार ३५३ रुपये खर्च अपेक्षित आहे. चंद्रपूर येथील मे. एसव्हीएम कंस्ट्रक्शनने ८९ लाख ०८ हजार ७५ रुपयांचा आराखडा मांडला आहे. ही निविदा सर्वात कमी किंमतीची असल्याने एस. व्ही. एम. कन्स्ट्रक्शनला सायन्स पार्क उभारणीचे काम देण्यावर स्थायी समितीच्या सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले.
स्थायी समितीच्या सभेत दुसरा महत्त्वाचा विषय शहरातील आझाद बगिचाच्या विद्युतीकरण व विकासाचा होता. त्याकरिता ५ कोटी ४२ लाख २५ हजार ९०१ रुपये खर्च अपेक्षित आहे. आझाद बगिचासाठी राबविलेल्या निविदा प्रक्रियेत नागपूर येथील मे. खळतकर कंस्ट्रक्शनने ८.६१ टक्के कमी दराने, चंद्रपूरच्या मे. विजय आर. घाटे इंजिनिअर कन्स्ट्रक्शनने ९.१० टक्के कमी दराने तर त्या दोघांपेक्षा अधिक किंमतीची नागपूर येथील मे. प्रशांत कंस्ट्रक्शनने निविदा दाखल केली होती. त्यातील सर्वात कमी दराची असलेली निविदा स्थायी समितीने मंजूर केली.
एकीकडे मनपा आझाद बगिचाचा विकास करू इच्छिते. त्याकरिता निविदा प्रक्रिया राबवून कामदेखील सोपविण्यात आले आहे. त्याच वेळी भाजपचे सदस्य धनंजय हूड व राहुल पावडे यांनी बगिचाच्या विकास कामावर नाराजी व्यक्त केली. शहरात अनेक समस्या कायम आहेत. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे चैनीचा बगिचा हवाच कशाला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सभेला स्थायी समितीचे सभापती संतोष लहामगे, मनपा आयुक्त संजय काकडे, उपायुक्त विजय इंगोले, लेखाधिकारी गायकवाड आदींसह समितीचे सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)