दररोज होतो स्फोटाचा आवाज अन घरांना बसतात हादरे ! नागरिकांत दहशत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 02:20 PM2024-11-28T14:20:40+5:302024-11-28T14:22:09+5:30
नागरिक दहशतीत : भद्रावतीतील 'तो' आवाज नेमका कुठला?
विनायक येसेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : मागील चार दिवसांपासून शहरात दररोज सकाळी ९:१५ वाजेच्या सुमारास दररोज स्फोटाचा आवाज होऊन घरांना हादरा बसण्याचा प्रकार घडत आहे. वेकोली आणि आयुध निर्माणीत सुर्योदयानंतर ब्लास्टिंगची कामे होत नसताना असा भयानक आवाज येत असल्याने नागरिकांत दहशत पसरली. तहसीलदार व ठाणेदारांनीही हा आवाज अनुभवला. मात्र, हा आवाज नेमका येतो कुठून, याबाबत नागरिकांत कमालीचा संभ्रम आहे.
भद्रावती शहराच्या सभोताल वेकोलीच्या खुल्या खाणी आहेत. त्यात कर्नाटक एम्टा व अरबिंदो खुली कोळसा खाणींची भर पडली. कोळसा काढण्यासाठी ब्लॉस्टिंगचा वापर केला जातो. मात्र, ब्लास्टिंग केव्हा करायचे याबाबत केंद्र सरकारचे कडक नियम आहेत. त्या नियमाचे पालन करून अशी ब्लास्टिंग केली जाते. सलग चार दिवसांपासून सकाळी ९:१५ वाजेच्या सुमारास ब्लास्टिंग होतो. त्यामुळे घराची दारे व खिडक्या हलतात. भांडे खाली पडतात. हा नेमका प्रकार काय आहे, असा प्रश्न नागरिक विचारू लागले. खुल्या कोळसा खाणीत ब्लास्टिंग किंवा आयुध निर्माणीतील आऊटडेटेड बॉम्ब निकामी केले जात असल्याने हा प्रकार घडत असल्याची नागरिकांत मोठी चर्चा आहे. याबाबत ठाणेदार अमोल काचोरे यांना विचारणा केली असता, कुठलीही अधिकृत माहिती नसल्याचे सांगितले.
या भागांत येतो भितीदायक आवाज
शहरात गौतम नगर, मल्हारी बाबा सोसायटी, सुमठाणा, गुरूनगर, पंचशील नगर, चंडिका वार्डातील काही भागात पहाटे ब्लास्टिंगचा मोठा आवाज येतो. या भागातील घरांना हादरे बसतात, अशी माहिती नागरिकांनी दिली. प्रशासनाने याबाबत तज्ज्ञांचे पथक गठित करून आयुध निर्माणी व वेकोली व्यवस्थापनाच्या दैनंदिन उत्पादनाशी संबंधित माहिती जाणून घ्यावी. हा प्रकार नेमका काय आहे, याबाबत शास्त्रोक्त व खरी माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे.
"पहाटे व सकाळच्या सुमारास दररोज स्फोटाचा आवाज मी देखील अनुभवला आहे. या प्रकाराबाबत आयुध निर्माणी प्रबंधकांकडे विचारणा केली. या वेळेत ब्लास्टिंग करण्याचा कुठलाही प्रकार सुरू नसल्याचे सांगितले. त्यामुळे आवाज नेमका कशाचा याबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्याच्या दृष्टीने तज्ज्ञांची मदत घेऊ."
- राजेश भांडारकर, तहसीलदार, भद्रावती
"खुल्या कोळसा खाणीत ब्लास्टिंगचा वापर केला जातो. मात्र सध्या खाणीत ब्लास्टिंग होत असल्याचे सांगण्यात आले. मी खुल्या कोळसा खाणीत काम करतो. ब्लास्टिंगचे एक वेळापत्रक ठरले असते. सूर्योदयानंतर ब्लास्टिंग होत नाही. ती देखील इतक्या भयंकर तीव्रतेची नसते. त्यामुळे प्रशासनाने सत्य शोधून काढावे."
- राजू डोंग, उपसरपंच तथा खाण कामगार, चेक बरांज