दरवर्षी २५ हजार नव्या वाहनांची गर्दी
By Admin | Published: December 30, 2014 11:29 PM2014-12-30T23:29:55+5:302014-12-30T23:29:55+5:30
सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक विभागाकडून विविध प्रयत्न सुरु आहेत. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांची संख्याही प्रचंड वाढत असून दरवर्षी २३ ते २५ हजार नवी वाहने रस्त्यावर येत आहेत.
रस्ते खचाखच : वाहतूक पोलिसांना भार पेलेना; अपघाताच्या घटनांत वाढ
मंगेश भांडेकर - चंद्रपूर
सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक विभागाकडून विविध प्रयत्न सुरु आहेत. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांची संख्याही प्रचंड वाढत असून दरवर्षी २३ ते २५ हजार नवी वाहने रस्त्यावर येत आहेत. त्या तुलनेत वाहतूक नियंत्रीत करणारे बोटावर मोजण्याइतके असून ही व्यवस्था तोकडी पडत आहे. जिल्ह्यात तीन लाख ७० हजार वाहने नियंत्रीत करण्यासाठी केवळ १४२ वाहतूक पोलीस कार्यरत असल्याने दिवसेंदिवस अपघात वाढतच आहेत.
जिल्हाभरात तीन लाख ७० हजार वाहने असून १५ पोलीस ठाण्याअंतर्गत १३० पोलीस शिपाई वाहतूक नियंत्रणासाठी कार्यरत आहेत. यात एकट्या चंद्रपूर शहरात ८० पोलीस आहेत. तर महामार्ग वाहतूक पोलीस म्हणून १२ कर्मचारी तैणात व आरटीओ कार्यालयाचे बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी कार्यरत आहेत. वाहन चालविण्याचे परवाने आरटीओ कार्यालयाकडून दरदिवसाला दिले जातात. मात्र, रस्त्यांची दुरवस्था याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. नियोजनाचा अभाव हा अपघाताच्या घटनांना कारणीभूत ठरत आहे. गतवर्षी रस्ते अपघातात २९२ जणांना जीव गेला. यावर्षी यात वाढ होऊन ३१४ जणांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागला आहे. अनेकदा वाहनाची फिटनेस नसतानाही त्या वाहनाने प्रवास केला जाते. त्यामुळे अपघात घडतात. यासाठी योग्य नियोजन व वाहनांच्या फिटनेसवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.