सर्वांनी विज्ञानाची कास धरावी - सुधीर मुनगंटीवार
By admin | Published: January 12, 2015 10:48 PM2015-01-12T22:48:35+5:302015-01-12T22:48:35+5:30
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’ असा नारा दिला. त्यानुसार सर्वांनी विज्ञानाची कास धरावी तरच दशाचा विकास होईल,
पेंढरी (कोके) : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’ असा नारा दिला. त्यानुसार सर्वांनी विज्ञानाची कास धरावी तरच दशाचा विकास होईल, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ, नियोजन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. नेरी येथे आयोजित ४० व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. च्या उपाध्यक्ष कल्पना बोरकर, जि.प.चे बांधकाम व शिक्षण सभापती देवराव भोंगळे, जि.प. सदस्य अल्का लोणकर, ब्रिजभूषण पाझारे, शांताराम चौखे, शालू येळणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे, चिमूर पं.स. चे संवर्ग विकास अधिकारी एस.आर. कांगणे, संस्थाध्यक्ष अरुण तुम्पलीवार, उपाध्यक्ष कमलाकर लोणकर, महासचिव पी.टी. ढोके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, मानवाला दैवीगुण दिला तो सत्कार्य करण्यासाठी. राज्यस्तरावर जिल्हातीलच विद्यार्थी प्रथम आला पाहिजे, असे सांगून या गावात २५ ते ३० लाखाचे विज्ञान भवन बांधून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
प्रास्ताविक शिक्षणाधिकारी रामदास पाटील यांनी केले. यावेळी देवराव भोंगळे, संध्या गुरनुले, कल्पना बोरकर यांनीही मार्गदर्शन केले. मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन एस.व्ही. कोंकमवार तर आभार रविकांत देशपांडे यांनी मानले. या प्रदर्शनासाठी जिल्हाभरातील विद्यार्थी नेरीमध्ये दाखल झाले आहेत. (वार्ताहर)