मुदतबाह्य झालेली औषधी बालकांना पाजली
By Admin | Published: December 9, 2015 01:21 AM2015-12-09T01:21:30+5:302015-12-09T01:21:30+5:30
राजुरा तालुक्यातील सुब्बई येथील अंगणवाडीतील बालकांना कालबाह्य झालेली औषधी पाजण्यात आल्याची संतापजनक घटना आज मंगळवारी उघडकीस आली आहे.
अनेक बालके आजारी : सुब्बई अंगणवाडीतील संतापजनक प्रकार
सुब्बई : राजुरा तालुक्यातील सुब्बई येथील अंगणवाडीतील बालकांना कालबाह्य झालेली औषधी पाजण्यात आल्याची संतापजनक घटना आज मंगळवारी उघडकीस आली आहे. कालबाह्य औषधी प्यायल्यामुळे अनेक बालकांवर विपरित परिणाम झाला असून काही बालके आजारी पडली आहेत.
बेजबाबदारपणाचा कळस गाठणाऱ्या या घटनेमुळे पालकवर्गात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, या प्रकाराची सखोल चौकशी करून निरागस चिमुकल्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
राजुरा तालुक्यातील सुब्बई या गावात एकात्मिक बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत अंगणवाडी चालविली जाते. अनेक चिमुकले या ठिकाणी शिकत आहे. या अंगणवाडीमध्ये पोषण आहारासोबत बालकांना दर महिन्यादोन महिन्यांनी जंताची औषधीही दिली जाते. दरम्यान, ६ डिसेंबरला अंगणवाडीमधील बालकांना अशी जंताची औषधी पाजण्यात आली. मात्र ही औषधी मुदतबाह्य होती. त्यामुळे त्या औषधीचा अनेक बालकांवर परिणाम झाला. दुसऱ्या दिवशी बालकांना ताप, हगवण व उलट्या सुरू झाल्या. यामुळे पालक चांगलेच घाबरले. त्यांनी परत बालकांना अंगणवाडी केंद्रात नेऊन यावर औषधोपचार करण्यासा सांगितले. त्यावेळी अंगणवाडी सेविकांनी स्वत:च चुकीने मुदबाह्य औषधी बालकांना पाजल्याची माहिती दिली. यामुळेच बालकांची प्रकृती बिघडल्याची त्यांनी कबुली दिली. त्यामुळे पालकांमध्ये चांगलाच संताप व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे, विलास नंदीगमवार या शिक्षकांनाही त्यांच्या लहान बालकाला पाजण्यासाठी अंगणवाडीमधून तीच मुद्दतबाह्य झालेली औषधी दिली. मात्र त्यांच्या लक्षात येताच त्यांनी ती औषधी न पाजता गावातील इतर पालकांना औषधीची मुदत संपल्याचे सांगितले. बालकांची प्रकृती आणखी बिघडत असल्याने सुब्बई येथून पाच किमी अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली (बु.) येथील डॉक्टरांना भ्रमणध्वनी करून बालकांवर उपचार करण्यास सुब्बई येथे येण्याची विनंती करण्यात आली. मात्र येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची विनंती धुडकावून देत सुब्बई येथे येण्यास चक्क नकार दिला. बालकांना ताप, हगवण, उलट्या सुरु आहेत. अखेर पालकांनी स्वत:च आपल्या पाल्यांना राजुरा येथील खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले आहे. साई तन्नीरवार, श्वेता नंदीगमवार, बाली बोटपल्ले सर्व रा. सुब्बई या मदरम्यान, या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून गांभीर्याने चौकशी करण्यात यावी व अत्यंत बेजबाबदारपणे चिमुकल्या बालकांना मुदतबाह्य औषधी देऊन त्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. (वार्ताहर)
वैद्यकीय अधिकाऱ्याकडूनही दखल नाही
आरोग्यसेविका मुख्यालयी नाही
सुब्बईसह राजुरा तालुक्यातील अनेक आरोग्यसेविका व वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे सुब्बईसारखी एखादी अनुचित घटना घडली तर वेळेवर उपचार होऊ शकत नाही. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन त्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी, अशीही मागणी यानिमित्ताने पालकांनी व नागरिकांनी केली आहे.
इतर अंगणवाडीमध्येही असाच प्रकार
जंतुसाठी देण्यात येणाऱ्या औषधींचा पुरवठा करताना त्याच मुदतबाह्य औषधींचाच पुरवठा करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे सुब्बईतील आणखी दोन अंगणवाडी व इतर अंगणवाडीमध्येही असाच प्रकार घडल्याची माहिती आता पुढे येऊ लागली आहे.