बेरोजगारांपुढे परीक्षा शुल्काचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:27 PM2019-03-18T23:27:15+5:302019-03-18T23:27:46+5:30

शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या नोकर महाभरतीत विविध विभागाच्या जागांसाठी पाचशे ते हजार रुपयांपर्यंत परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे. आधीच बेरोजगार, मग एवढे पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या बेरोजगार युवकांना पडला आहे. यामुळे संतापलेला युवावर्ग आता मानसिक तणावासोबतच आर्थिक तणावातही गुरफटला जात आहे. या प्रकारामुळे अनेक होतकरू व हुशार युवक अर्ज भरण्यास असमर्थ ठरत आहेत.

Exam fee crisis before unemployed | बेरोजगारांपुढे परीक्षा शुल्काचे संकट

बेरोजगारांपुढे परीक्षा शुल्काचे संकट

Next
ठळक मुद्देपैसे आणायचे कुठून? : प्रत्येक परीक्षेसाठी हजारो रुपये शुल्क

परीमल डोहणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या नोकर महाभरतीत विविध विभागाच्या जागांसाठी पाचशे ते हजार रुपयांपर्यंत परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे. आधीच बेरोजगार, मग एवढे पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या बेरोजगार युवकांना पडला आहे. यामुळे संतापलेला युवावर्ग आता मानसिक तणावासोबतच आर्थिक तणावातही गुरफटला जात आहे. या प्रकारामुळे अनेक होतकरू व हुशार युवक अर्ज भरण्यास असमर्थ ठरत आहेत.
मागील काही वर्षांपूर्वी शासनाने नोकर भरती बंद केली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची फौज तयार झाली आहे. दरम्यान, शासनाने २०१९ ला मोठ्या प्रमाणात नोकभरती राबविण्याची घोषणा केली. त्यामुळे अनेक युवक स्पर्धा परीक्षेची तयारी जोमाने करु लागले. काही दिवसांपूर्वीच विविध पदांच्या भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध झाल्या. मात्र त्या पदभरतीसाठी पाचशे ते हजार रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे. बेकारी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे युवक मिळेल ते काम करुन स्पर्धा परीक्षेची तयार करीत आहेत. मात्र पदभरतीमध्ये हजारो रुपये शुल्क आकारण्यात येत असल्यामुळे अनेकजण अर्ज भरणे टाळत आहेत. परिणामी अनेकांचे शासकीय नोकरीचे स्वप्न अंधातरीच राहण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
असे आहे परीक्षा शुल्क
राज्य मार्ग परिवहन महामंडळातील ७६ जागांसाठी खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये तर मागसवर्गीयसाठी ५०० रुपये, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक हजार रुपये, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक एक हजार, भारतीय रेल्वे विभाग खुला व ओबीसी ५००, मागासवर्गीय २५०, राष्ट्रीय केमिकल्स व फर्टिलायझर्स ७०० रुपये, युनियन बॅक आॅफ इंडिया ६०० रुपये, बँक आॅफ बळोदा ६००, कर्मचारी राज्य विमा महामंडळ पाचशे रुपये, तलाठी भरती खुला व इतर मागासवर्गीय ५००, मागासवर्गीय ३५०, शिक्षक भरती ५०० रुपये, भारतीय जिवन विकास महामंडळ ६०० रुपये अशा विविध ठिकाणी पाचशेच्या वर शुल्क आकारण्यात येत आहे. यासोबतच बँक शुल्क उमेदवाराला वेगळे द्यावे लागते.
एका अर्जामागे दीड ते दोन हजार खर्च
नुकत्याच राबविण्यात येत असलेल्या नोकर भरतीमध्ये पाचशे ते हजार रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे. सदर शुल्क भरण्यासाठी बँकेचे शुल्क वेगळे, अर्ज भरताना नेट कॅफेचे शुल्क, अर्ज प्रिंट करणे आदीसाठी पैसे मोजावे लागतात. त्यासोबत अनेक विभागाच्या परीक्षा या जिल्हा पातळीवर नसून विभागीयस्थळी असतात. त्यामुळे प्रवास खर्च वेगळा असा सरासरी एका अर्जाला दीड ते दोन हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे अर्ज भरताना युवकांना मोठी कसरत करावी लागते.
भरती रद्द तर होणार नाही?
विविध पदांच्या भरतीसाठी जागा निघाल्या आहेत. मात्र नुकताच लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्यातच आदर्श आचारसंहितेची घोषणा झाली आहे. निवडणुकीचा निकाल मे महिन्यात जाहीर होणार आहे. त्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे नोकर भरती रद्द तर होणार नाही ना, अशी भीती बेरोजगार युवकांना सतावत आहे.

Web Title: Exam fee crisis before unemployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.