किबी बाईट्स कॉम्प्युटर इन्स्टिट्युट केंद्राच्या विरोधात परीक्षार्थ्यांत संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:06 AM2017-09-12T00:06:19+5:302017-09-12T00:06:34+5:30
आॅनलाईन परीक्षा केंद्रावर नादुरूस्त संगणक व लिंक जुळत नसल्याने अनेक परीक्षार्थिंना मनस्ताप सहन करावा लागल्याचा ....
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आॅनलाईन परीक्षा केंद्रावर नादुरूस्त संगणक व लिंक जुळत नसल्याने अनेक परीक्षार्थिंना मनस्ताप सहन करावा लागल्याचा प्रकार बाबुपेठ बायपास मार्गावरील किबी बाईट्स कॉम्प्युटर इन्स्टिट्युट केंद्रावर शनिवार व रविवारी घडला. आॅनलाईन एक प्रश्न सोडविण्यासाठी बराच वेळ जात होता. या प्रकारामुळे अनेक विद्यार्थ्यांना पूर्ण प्रश्न सोडविता आले नाही. त्यामुळे परीक्षार्थींचे नुकसान झाले असून या केंद्रावरील सर्व परीक्षार्थीची पुन्हा परीक्षा घेवून सदर परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
रिजनल रुरल बँकेत (आरआरबी) परिविक्षाधिन अधिकारी या पदासाठी शनिवार व रविवारला सर्वत्र पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी चंद्रपूर शहरात तीन परीक्षा केंद्र देण्यात आले होते. यापैकी किबी बाईट्स कॉम्प्युटर इंन्स्टिट्युट केंद्रावरील परीक्षार्थींना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. देशातील विविध बँकांमध्ये पदभरती करण्यासाठी परीक्षांचे कंत्राट काही नामांकित कंपन्यांना देण्यात आले आहे. आरआरबी पीओ साठी परीक्षा प्रक्रिया आटोपण्याचे कंत्राट इन्स्टिट्युट आॅफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) कडे देण्यात आले आहे. अ
आयआरबी पीओसाठी आॅनलाईन पूर्व परीक्षा शनिवारी व रविवारी आटोपली. या आॅनलाईन परीक्षेत एटीट्युट आणि रिजनिंग असे दोन प्रत्येकी ४० गुणांचे पेपर होते. ४५ मिनिटात हे दोन्ही पेपर सोडवायचे होते. या परीक्षेसाठी चंद्रपुरात तीन परीक्षा केंद्र ठेवण्यात आले. त्यापैकी किबी बाईट्स कॉम्प्युटर इन्स्टिट्युट हे एक केंद्र होते. या केंद्रातील बहुतेक संगणक हे जुने आणि नादुरुस्त अवस्थेत होते. त्यामुळे प्रश्नपत्रिका डाऊनलोड करणे तसेच प्रश्नाचे उत्तर सेव्ह करताना बराच वेळ लागत होता. त्यात विद्यार्थ्यांचा बराच वेळ गेला. याबाबत परीक्षार्थींनी विचारणा केली असता, केंद्र संचालकाकडून सर्व्हर प्रॉब्लेम असल्याचे सांगण्यात आले. मात्र, इतर कोणत्याही परीक्षो केंद्रावर विद्यार्थ्यांना अशी अडचण गेली नाही. त्यामुळे अधिक माहिती घेतल्यानंतर या केंद्रातील संगणक जुने आणि नादुरुस्त असल्यामुळे लिंक निट जुळत नव्हती. त्यामुळे आॅनलाईन परीक्षा देताना विद्यार्थ्यांना नाहक मनस्पात सहन करावा लागला.
केंद्र संचालकाच्या चुकीमुळे परीक्षार्थींना नाहक त्रास सहन करावा लागत असेल तर परीक्षा पुन्हा का घेण्यात येऊ नये, असा प्रश्न परीक्षार्थींनी केला आहे. यासाठी सोमवारी अन्यायग्रस्त परीक्षार्थींनी जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन निवेदन दिले. यात सदर परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याची मागणी केली असून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी अमर जिल्हेकर, सध्धम फुलझेले, दीपक गेडाम, प्रशांत खापर्डे, अनिकेत करमनकर यांच्यासह ४२ परीक्षार्थी उपस्थित होते.