रोगग्रस्त धानशेतीची कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी
By Admin | Published: October 21, 2016 01:03 AM2016-10-21T01:03:43+5:302016-10-21T01:03:43+5:30
बल्लारपूर तालुक्यातील इटोली, मानोरा, कवडजई, किन्ही, कोर्टी, पळसगाव व कवडजई गावातील ५०० हेक्टर
नुकसानभरपाईची मागणी : २२० हेक्टर क्षेत्रात रोगाचा प्रार्दुभाव
कोठारी : बल्लारपूर तालुक्यातील इटोली, मानोरा, कवडजई, किन्ही, कोर्टी, पळसगाव व कवडजई गावातील ५०० हेक्टर धानशेतात तुडतुडा रोगकिडीचा प्रार्दूभाव झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच कृषी विभाग जागे झाले. किडीग्रस्त धानशेताच्या क्षेत्राची गावागावात तपासणी केली असता, मोठ्या प्रमाणात धान उत्पादनावर परिणाम होण्याचे संकेत त्यांनी दिले. त्यांच्या तपासणी अहवालानुसार २२० हेक्टर धानपिक धोक्यात आल्याचे सांगीतले.
रोगग्रस्त धानपिकाची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरिता आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोराचे माजी प्राचार्य डॉ. पालारपवार, सिंदेवाही कृषी संशोधन केंद्राचे डॉ. प्रविण देशपांडे, कृषी विकास अधिकारी प्रविण देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी कचराळे, बल्लारपूर तालुका कृषी अधिकारी नरेश ताजणे, प्रभारी मंडळ कृषी अधिकारी डॉ. मारोती वरभे, कृषी सहाय्यक प्रशांत गजभीये, सरपंच गोपाल बोभाटे यांनी बल्लारपूर तालुक्यातील धानपिक किडीग्रस्त गावांना व शेतकऱ्यांना भेटी दिल्या. या रोगावर प्रतिबंधक उपाययोजना समजावून सांगितल्या. (वार्ताहर)