अमृत योजनेचे खोदकाम नगरसेवकाने रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:26 AM2021-02-14T04:26:20+5:302021-02-14T04:26:20+5:30
चंद्रपूर : शहरातील एम.ई. एल प्रभागात अमृत योजनेचे काम सुरु करण्यात आले. मात्र याबाबत नगरसेवकाला कुठलीही सूचना दिली नाही. ...
चंद्रपूर : शहरातील एम.ई. एल प्रभागात अमृत योजनेचे काम सुरु करण्यात आले. मात्र याबाबत नगरसेवकाला कुठलीही सूचना दिली नाही. तसेच संपूर्ण काम नियोजनशून्य असल्याने शहर खड्डेमय झाला असून अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे नगरसेवक सचिन भोयर यांनी अमृत योजनेचे खोदकाम बंद पाडले. तसेच अभियंता व सुपरवायझरला खडेबोल सुनावले. चंद्रपूर शहरात अमृत योजनेंतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. मात्र हे काम करताना संबंधित कंत्राटदाराने कुठलेही नियोजन केले नाही. कंत्राटदराकडून करारनाम्यातील अटी व शर्तीचे उल्लंघन होत आहे. तसेच नागरिकांच्या सुरक्षेचे कोणतेही मापदंड कंत्राटदार पाळत नसल्याचे दिसून येते आहे. शहरातील खड्ड्यांमुळे दररोज छोटे मोठे अपघात होत असून नागरिक जखमी होत असल्याच्या घटना घडत आहेत. या समस्येबाबत मनपा आमसभेत नगरसेवक सचिन भोयर यांनी आवाज उठवला होता. मात्र कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. तसेच एम. ई. एल प्रभागात पाईप लाईन टाकण्याचे काम करताना कोणतीही सूचना दिली नाही. त्यामुळे नगरसेवक भोयर यांनी खोदकाम रोखून अभियंता व सुपरवायझरला खडेबोल सुनावले. कामात सुधारणा न केल्यास काम सुरू होऊ देणार नाही, असा इशाराही भोयर यांनी दिला आहे.