गुप्तधनासाठी जुनोना परिसरात खोदकाम ?
By admin | Published: May 25, 2015 01:36 AM2015-05-25T01:36:50+5:302015-05-25T01:36:50+5:30
शहरातील बाबुपेठ, पठाणपुरा, भानापेठ, लालपेठ, इंदिरानगर, वडगाव परिसरात गुप्तधन शोधणारी टोळी सक्रिय झाल्याची विश्वसनीय माहिती आहे.
रुपेश कोकावार बाबुपेठ (चंद्रपूर)
शहरातील बाबुपेठ, पठाणपुरा, भानापेठ, लालपेठ, इंदिरानगर, वडगाव परिसरात गुप्तधन शोधणारी टोळी सक्रिय झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. या टोळीत युवावर्गही गुंतला असल्याचे दिसून येत असल्याने या प्रकारातील गांभीर्य वाढले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हवामानात होणाऱ्या बदलाचा यात गुंतलेला तथाकथित मांत्रिक आधार घेत असतो. आता काही दिवसातच पावसाळ्याला सुरुवात होणार असल्याने या टोळीतील सदस्य एकमेकांच्या संपर्कात येत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, जुनोना तलाव परिसरात या हेतूने खोदकाम केले जात असल्याचीही माहिती आहे. मात्र याबाबत पोलीस अनभिज्ञ असल्याने अशा टोळक्यांवर अद्याप वचक बसू शकला नाही.
पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रध्देविरुद्ध लढा देत असलेल्या डॉ. दाभोळकरांची हत्या करण्यात आली. या भ्याड हल्ल्याला न घाबरता आजही अनेक सामजिक संस्था लोकांमधील अंधश्रद्धा दूर करण्याकरिता भोंदू बाबांविरुद्ध लढा देत आहे. तरीही अंधश्रध्देने अजूनही अनेकांना आपल्या पाशात अडकविल्याचे दिसून येते. कमी वेळात श्रीमंत होण्याच्या नादाला लागलेल्या समाजातील काही भामट्यांना या नादापासून दूर करणे आता गरजेचे झाले आहे. पूजापाठ करुन गुप्त धन मिळविता येते, अशी अंधश्रध्दा बाळगून अनेकजण लाखो रुपयांची उधळपट्टी करीत असल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे नवनवे शोध लावून देश प्रगतीचे शिखर गाठत आहे. मात्र याच समाजातील एक टप्पा आजही अंधश्रध्देने ग्रासला आहे. विशेष म्हणजे, यात सुशिक्षित वर्गही मोठ्या प्रमाणात गुतंला आहे. उन्हाळा संपायला लागताच चंद्रपूर जिल्ह्यातील काही टोळ्या गुप्त धनाच्या मागावर लगतात. यासाठी बाहेर राज्यातून स्वयंघोषित तांत्रिकांना पाचारण केले जाते. या भोंदूबाबांवर लाखो रुपये खर्च केले जातात. त्यानंतर हे भोंदूबाबा लाखोंचा चुना लावून पसार होतात.
गुप्त धनाच्या नादाला लागून सर्वस्व हरवून बसणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या नादाला लागून अनेकाचे हसते खेळत संसार उध्दवस्त झाले आहे. त्यामुळे हा प्रकार गंभीर बनत चालला आहे. गुप्तधनाच्या नादाला लागलेल्या टोळ्या आता सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे.
या टोळीत दोन प्रकारच्या लोकांचा समावेश असतो. यातील एक टोळी गुप्तधन कुठे आहे, हे सांगणारी तर दुसरी टोळी सांगितलेल्या जागेवर खोदकाम करणारी असते. अर्थात या दोन्ही टोळ्या यातून लोकांना फसविणाऱ्याच असतात. एखाद्या जागेची यातील तांत्रिकाकडून पाहणी केली जाते. मग त्या ठिकाणी गुप्तधन असल्याची अफवा पसरवित संबंधिताला अंधश्रध्देच्या जाळ्यात ओढले जाते. हे धन शोधण्यासाठी पूजापाठ केला जातो. लाखो रुपये संबंधित तांत्रिकाला पूजेसाठी दिले जातात. चंद्रपुरातील बाबुपेठ, पठाणपुरा, भानापेठ, लालपेठ, इंदिरानगर, वडगाव परिसरात मागील काही दिवसांपासून गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. या परिसरातील अनेक ठिकाणी काही नागरिक व युवकांकडून गुप्तधनाबाबत चर्चा ऐकायला मिळत आहे. विशेष म्हणजे, जुनोना तलाव परिसरात दोन दिवसाआड विविध ठिकाणी खोदकाम केल्याचे दिसून येत आहे. हे खोदकाम गुप्तधन शोधण्यासाठीच केल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.