म्युकरमायकोसिसवरील खर्च ६ लाख शासनाची मदत केवळ दीड लाखांची!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 05:00 AM2021-05-21T05:00:00+5:302021-05-21T05:00:37+5:30
जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली. पण, उपचारादरम्यान स्टेराईडचा अति वापर झालेल्या व काही अनियंत्रित मधुमेही रुग्णांना म्युकरमायकोसिस हा आजार होत आहे. चंद्रपुरात बुधवारी अशा ५२ रुग्णांची नोंद जिल्हा आरोग्य प्रशासनाने घेतली. हे रुग्ण शहरातील विविध खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. म्युकरमायकोसिसवरील लिपोसोमल एम्पोटीरीसिन-बी सहा इंजेक्शन द्यावे लागतात. एका इंजेक्शनची किमत सात हजार रुपये आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनातून बरे झाल्यानंतर काही रुग्णांना म्युकरमायकोसिस नावाच्या काळी बुरशी आजाराचा सामना करावा लागत आहे. या आजारावरील उपचाराचा खर्च सुमारे ६ लाखांपर्यंत आहे. मात्र, महात्मा जोतिबा फुले योजनेतून शासनाकडून केवळ दीड लाखांची मदत मिळणार आहे. त्यामुळे उर्वरित पैसे कुठून आणायचे, या प्रश्नाने रुग्णांचे कुटुंबीय धास्तावले आहेत.
जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली. पण, उपचारादरम्यान स्टेराईडचा अति वापर झालेल्या व काही अनियंत्रित मधुमेही रुग्णांना म्युकरमायकोसिस हा आजार होत आहे. चंद्रपुरात बुधवारी अशा ५२ रुग्णांची नोंद जिल्हा आरोग्य प्रशासनाने घेतली. हे रुग्ण शहरातील विविध खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. म्युकरमायकोसिसवरील लिपोसोमल एम्पोटीरीसिन-बी सहा इंजेक्शन द्यावे लागतात. एका इंजेक्शनची किमत सात हजार रुपये आहे. आता हे इंजेक्शन आरोग्य विभागच खरेदी करीत आहेत. पण, खासगी डॉक्टरांचा उपचाराचा खर्च जास्त असल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली.
रुग्णांच्या नातेवाईकांना पैशाची चिंता
गुरुवारपासून आरोग्य विभागानेच खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना हे इंजेक्शन पुरविण्याचा निर्णय घेतला. मात्र, पॉसॅकोनाझोल गोळ्यांचाही तुटवडा कायम आहे. शासनाकडून किती मदत मिळेल, याबाबत काही माहिती नाही.
- महेंद्र शिंगणे,
तुकूम, चंद्रपूर
म्युकरमायकोसिस आजाराच्या उपचारासाठी सुमारे चार ते पाच लाखांचा खर्च येतो, असा अंदाज डॉक्टरांनी वर्तविला. सरकार विमा योजनेतून दीड लाखांचा खर्च देणार आहे. मात्र, उर्वरित रकमेची सोय नाही. त्यामुळे कुठून जमवाजमव करायची हा प्रश्न आहे.
- सुधाकर राऊत,
समाधी वाॅर्ड, चंद्रपूर
खासगी रुग्णालयात अतिरिक्त आकारणी
म्युकरमायकोसिसग्रस्त रुग्णांवर उपचार करणारे काही डॉक्टर अतिरिक्त शुल्क आकारणी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा खर्च वाढतो. जिल्हाधिकारी यांच्या परवानगीनेच या आजारावरील इंजेक्शन वितरण करण्याच्या सूचना राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालकांनी सोमवारी दिल्या. इंजेक्शनप्रमाणेच उपचाराचे शुल्कही निश्चित करून देण्याची मागणी रुग्णांच्या एका नातेवाईकाने केली आहे.