म्युकरमायकोसिसच्या रूग्णांसाठी खनिज विकास निधीतून खर्च उचलावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 05:00 AM2021-05-22T05:00:00+5:302021-05-22T05:00:53+5:30
अनेक रूग्ण खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. साधारणतः पाच ते साडेपाच लाख रूपये खर्च या आजारावरील उपचारासाठी येतो. हा खर्च सर्वसामान्य रूग्णांना परवडणारा नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्हयातील म्युकरमायकोसिस या आजाराच्या रूग्णांवर खनिज विकास निधी अंतर्गत पाच लाख रुपये इतका खर्च जिल्हा प्रशासनाने उचलावा, अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्हयातील सहा रूग्णालयात म्युकरमायकोसिस या आजारावर उपचार करता येत नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय तसेच सामान्य रूग्णालय येथे या आजारावरील उपचाराशी संबंधित यंत्रसामुग्री उपलब्ध नाहीत. अनेक रूग्ण खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. साधारणतः पाच ते साडेपाच लाख रूपये खर्च या आजारावरील उपचारासाठी येतो. हा खर्च सर्वसामान्य रूग्णांना परवडणारा नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्हयातील म्युकरमायकोसिस या आजाराच्या रूग्णांवर खनिज विकास निधी अंतर्गत पाच लाख रुपये इतका खर्च जिल्हा प्रशासनाने उचलावा, अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना पाठविलेल्या पत्रात आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे की चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना महामारीच्या संकटात म्युकरमायकोसिस या आजाराचे संकट उदभवले आहे. या क्षणापर्यंत म्युकरमायकोसिसचे ५४ रूग्ण आपल्या जिल्हयात आढळले आहेत. त्यापैकी ३३ रूग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या असून दुर्देवाने एकाचा मृत्यू झाला आहे. हा बुरशीजन्य आजार जीवघेणा असून अनेक रूग्णांना आपले डोळे, जबडा गमवावा लागतो व आयुष्यभर त्याची भरपाई होवू शकत नाही.
यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी पाठपुरावा करून आम्ही सदर आजाराचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत करण्याचा निर्णय घ्यायला लावला. या योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्हयात सहा खासगी रूग्णालये आहेत. मात्र त्यापैकी एकाही रूग्णालयात म्युकरमायकोसीस या आजारावर उपचार करता येवू शकत नाही. सामान्य रूग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथे या आजारावर उपचारासाठी यंत्रसामुग्री उपलब्ध नाही. अनेक रूग्ण खाजगी रूग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल हात आहेत. याठिकाणी प्रत्येक रूग्णावर पाच ते साडेपाच लक्ष रू. खर्च होतात. त्यामुळे रूग्णाच्या कुटूंबियांचे आर्थिकदृष्टया कंबरडे मोडत आहे. त्यामुळे तातडीने खनिज विकास निधी अंतर्गत सदर रूग्णांसाठी पाच लक्ष रू. खर्च उचलण्याचा निर्णय घेण्याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली आहे.