शाळा न भरताच विद्यार्थ्यांच्या कलागुणांची रक्कम खर्च ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 05:00 AM2021-08-02T05:00:00+5:302021-08-02T05:00:51+5:30

युवा शक्ती सुधारल्यास देशाचा विकास होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युवा शक्तीच्या बाबतीत विशेष दृष्टिकोन आहे.  त्यामुळे २०१९-२० या वर्षासाठी शाळांमध्ये युवा व इको क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी जिल्ह्यातील ५७८ उच्च प्राथमिक शाळांना प्रत्येकी १० हजार रुपये तसेच १ हजार ४३ शाळांना प्रत्येकी पाच हजार रुपये असे एकूण १ कोटी ९ लाख ९५ हजार रुपये १९ मार्च २०२० रोजी मंजूर करून संबंधित शाळांच्या पंचायत समितीच्या खात्यामध्ये आरटीजीएस पद्धतीने वर्ग करण्यात आले आहे.

Expenditure on students' art without paying for school? | शाळा न भरताच विद्यार्थ्यांच्या कलागुणांची रक्कम खर्च ?

शाळा न भरताच विद्यार्थ्यांच्या कलागुणांची रक्कम खर्च ?

Next
ठळक मुद्देमुख्याध्यापकांची खर्चासाठी तत्परता : युवा व इको क्लबची रक्कम होणार वसूल

साईनाथ कुचनकार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्यामधील नेतृत्वगुण, प्रतिभा आणि सर्जनशीलता यामध्ये वाढ, आत्मविश्वास, छंद आणि विविध कौशल्य विकसित करण्यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत युवा व इको क्लब शाळांमध्ये स्थापन करून देण्यात आलेला निधी खर्च करावयाचा होता. मागील वर्षभर कोरोना संकटामुळे शाळा भरलीच  नाही. असे असतानाही काही मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या विकासाचा निधी खर्च करीत तत्परता दाखविली आहे. त्यामुळे आता हा निधी शिक्षकांकडून वसूल करण्यात येणार आहे.
युवा शक्ती सुधारल्यास देशाचा विकास होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युवा शक्तीच्या बाबतीत विशेष दृष्टिकोन आहे.  त्यामुळे २०१९-२० या वर्षासाठी शाळांमध्ये युवा व इको क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी जिल्ह्यातील ५७८ उच्च प्राथमिक शाळांना प्रत्येकी १० हजार रुपये तसेच १ हजार ४३ शाळांना प्रत्येकी पाच हजार रुपये असे एकूण १ कोटी ९ लाख ९५ हजार रुपये १९ मार्च २०२० रोजी मंजूर करून संबंधित शाळांच्या पंचायत समितीच्या खात्यामध्ये आरटीजीएस पद्धतीने वर्ग करण्यात आले आहे. शासनाचा उद्देश चांगला होता. मात्र, कोरोनामुळे मागील वर्षभर प्राथमिकचे वर्गच भरले नाहीत. त्यातच माध्यमिकचेही काही दिवसच वर्ग भरले. त्यामुळे ज्या उद्देशासाठी शाळांना निधी देण्यात आला, तो उद्देश साध्य झाला नाही. असे असतानाही काही शाळांतील शिक्षकांनी निधी खर्च केल्याचे शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आता गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांना पत्र पाठवून खर्च झालेला निधी तत्काळ वसूल करण्यासंदर्भात कळविले आहे. त्यामुळे सध्या काही मुख्याध्यापकांना चांगलाच घाम सुटला असून ही रक्कम कशी वसूल करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेआहे.

असा मिळाला होता निधी
सन २०१९-२० मध्ये समग्र शिक्षा अभियानांतर्गत युवा व इको क्लबसाठी जिल्ह्यातील ५७८ उच्च प्राथमिक शाळांसाठी प्रत्येकी १० हजार रुपयाप्रमाणे ५७ लाख ८० हजार, तर १०४३ प्राथमिक शाळांसाठी ५  हजार रुपयांप्रमणे ५२ लाख १५ हजार असे एकूण १ कोटी ९ लाख ९५ हजार रुपये देण्यात आले होते.

अशी करायची होती क्लबची निवड

समग्र शिक्षा अभियानांतर्गत स्थापन करण्यात येणाऱ्या क्लबचा उद्देश ठरवून देण्यात आला. याअंतर्गत वादविवाद क्लब, कला आणि सांस्कृतिक क्लब, पुस्तक वाचन क्लब, क्रीडा क्लब स्थापन करावयाचा होता. या माध्यमातून विद्यार्थ्यांचे कलाकौशल्य विकसित करणे हा उद्देश होता. यामध्ये प्रत्येक क्लबमध्ये कमीत कमी ११ आणि जास्तीत जास्त कितीही सदस्य घेता येणार होते.

मागील वर्षी शाळाच भरली नाही. त्यामुळे निधी खर्च करण्याचा प्रश्नच नाही. मात्र, ज्या शाळांना वितरित केलेला निधी खर्च केला असेल, अशा शाळांची माहिती मागितली आहे. यावर लवकरच निर्णय घेतला जाईल.
- दीपेंद्र लोखंडे
शिक्षणाधिकारी प्राथमिक, चंद्रपूर

युवा व इको क्लब अनुदान खर्च करण्यात येऊ नये अशा स्पष्ट लेखी सूचना शाळांना देण्यात आलेल्या नव्हत्या. त्यामुळे काही शाळांनी अनुदान खर्च केले. अशा परिस्थितीत खर्च केलेले अनुदान वसूल करणे तर्कसंगत नाही. त्याचप्रमाणे खात्यातील शिल्लक व्याजसुद्धा परत करावे लागते. शाळेला प्राप्त विविध अनुदानावरील व्याज शाळेच्या खात्यावर जमा होत असते. तो खर्च करण्याचा अधिकार शाळेला असणे आवश्यक आहे. 
- प्रकाश चुनारकर
राज्य सहकार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद  (प्राथमिक)
 

 

Web Title: Expenditure on students' art without paying for school?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा