अधिकृत दारू दुकानातून दारूची बेभाव विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:32 AM2021-09-24T04:32:52+5:302021-09-24T04:32:52+5:30
राजुरा :चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी हटवून दारू विक्री सुरू करण्यात आली. शासनाकडून दुकानदारांना लायसन्स देऊन नियमानुसार दारू विक्रीची मुभा ...
राजुरा :चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी हटवून दारू विक्री सुरू करण्यात आली. शासनाकडून दुकानदारांना लायसन्स देऊन नियमानुसार दारू विक्रीची मुभा देण्यात आली. परंतु दारू दुकानदाराकडून बेभाव विक्री सुरु आहे. तसेच उत्पादन शुल्क खात्याकडून दारू पिणाऱ्यांना एका वर्षाचे लायसन्स देणे सुरू केले नाही, हे विशेष.
वाईन बारमध्ये १८० रुपयांची दारूची बॉटल २५० रुपये व बीअर २४० रुपयात विक्री केली जात आहे. तसेच बीअर शॉपीमध्येही २० रुपये अधिकचे घेतले जात आहे. लायसन्सधारक देशी दारूची विक्रीही २० रुपये जास्त घेऊन करीत आहे. याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मात्र दुर्लक्ष होत आहे. दारुबंदीचा सहा वर्षाचा वनवास भोगल्यानंतर दारू दुकानदारांना आता सुगीचे दिवस आले आहे. याच संधीचा फायदा व दारू पिणाऱ्या लोकांची गरज लक्षात घेऊन खुलेआम जास्त पैसे घेऊन लूटमार करीत आहे. याबाबत दारू दुकानदारांना विचारणा केली असता आम्हास सेल टॅक्स व जीएसटी लागतो, असे उत्तर दिले जाते. वास्तविक पाहता एमआरपी किंमत सेल टॅक्ससहित असताना पुन्हा विक्रीकर कसा काय लागतो, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.