बहुजन समाजाचे शोषण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 11:26 PM2018-08-12T23:26:10+5:302018-08-12T23:26:31+5:30
देशात आरएसएस पुरस्कृत भाजपा सरकारकडून देशातील बहुसंख्य बहुजन समाजाचे शोषण सुरू आहे. या समाजाला विकासापासून वंचित ठेवण्याचे धोरण भाजप सरकार राबवित आहे. देशात एकाधिकारशाही आणून बहुजनांना सत्तेपासून व प्रशासनापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र भाजपा सरकार राबवित असल्याचा आरोप भारिप - बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : देशात आरएसएस पुरस्कृत भाजपा सरकारकडून देशातील बहुसंख्य बहुजन समाजाचे शोषण सुरू आहे. या समाजाला विकासापासून वंचित ठेवण्याचे धोरण भाजप सरकार राबवित आहे. देशात एकाधिकारशाही आणून बहुजनांना सत्तेपासून व प्रशासनापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र भाजपा सरकार राबवित असल्याचा आरोप भारिप - बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी केला.
वंचित बहुजन आघाडी संवाद यात्रा शनिवारी चंद्रपुरात दाखल झाली. यावेळी राजीव गांधी कामगार सभागृहात संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये बहुजन समाजातील नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली.
कार्यक्रमाला माजी आमदार ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण माने, माजी आमदार हरिदास भदे, विजय मोरे, कृष्णाजी नागपुरे, एल. के. मडावी, कुशल मेश्राम, जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे, माजी नगरसेवक बंडू हजारे, महासचिव धिरज बांबोळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना अॅड. आंबेडकर म्हणाले, देशात काही निवडक उद्योजकांची मक्तेदारी सुरू आहे. या उद्योजकांच्या माध्यमातून देशातील जनतेला लुटण्याचे धोरण मोदी सरकार राबवित आहे. याद्वारेच भाजपा आणि आरएसएस देशात एकाधिकारशाहीचे राज्य तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. जर एकाधिकारशाही देशात अस्तित्वात आली तर बहुजनांना कोणत्याच संधी मिळणार नाही. त्यामुळे बहुजनांनी वेळीच सावध होणे आवश्यक आहे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आरएसएस, भाजपाचे हे डाव उधळून लावू, यासाठी बहुजनांनी साथ द्यावी, असे आवाहन अॅड. आंबेडकर यांनी केले.
राज्यातील सत्ता काही कुटुंबाच्या हातात केंद्रीत झाली असून, बहुजणांना सत्तेपासून रोखण्याचे काम सुरू आहे. देशात बहुजणांची संख्या सर्वाधिक असताना हा बहुजन समाज सत्तेपासून दूर आहे. ओबीसी, धनगर, आदिवासी, माळी आणि बौद्धांनी एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडीचे सरकार सत्तेवर आणण्यासाठी संघटीत व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण माने, माजी आमदार हरिदास भदे, विजय मोरे, कृष्णाजी नागपुरे, एल. के. मडावी यांनी मार्गदर्शन करताना भाजप सरकारवर टिका करीत सर्वांनी संघटीत होण्याचा सल्ला दिला.
कार्यक्रमाचे आयोजन भारिप- बमसंचे जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे महासचिव धीरज बांबोळे, बंडू ठेंगरे, खुशाल मेश्राम, रूपचंद निमगडे, सुमित मेश्राम, राजू किर्तक, तनुजा रायपुरे, लता साव, कल्पना अलोणे, निशा ठेंगरे, पी. डब्लू. मेश्राम, कुसूर दुपारे यांनी केले होते. या कार्यक्रमाला जिल्हाभरातील बहुजन जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.