तोहोगाव वनक्षेत्रात बांबू कामगारांचे शोषण !

By admin | Published: January 26, 2016 12:44 AM2016-01-26T00:44:30+5:302016-01-26T00:44:30+5:30

मध्य चांदा वनप्रकल्प विभाग बल्लारशाह अंतर्गत तोहोगांव वनपरिक्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात बांबु कटाईची कामे स्थानिक व परप्रांतीय मजुरांकडून केल्या जात आहे.

Exploitation of bamboo workers in the forest area! | तोहोगाव वनक्षेत्रात बांबू कामगारांचे शोषण !

तोहोगाव वनक्षेत्रात बांबू कामगारांचे शोषण !

Next

एफडीसीएमचा प्रताप : सखोल चौकशी होणे गरजेचे
सुरेश रंगारी कोठारी
मध्य चांदा वनप्रकल्प विभाग बल्लारशाह अंतर्गत तोहोगांव वनपरिक्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात बांबु कटाईची कामे स्थानिक व परप्रांतीय मजुरांकडून केल्या जात आहे. मात्र त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला दिला जात नसल्याच्या अनेक मजुरांच्या तक्रारी आहेत. या क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी गुडपल्ले हे यासाठी जबाबदार असल्याचे मजुरांकडून बोलले जात आहे. त्यास वरिष्ठ अधिकारी सहकार्य करीत असल्याची स्थानिकांची ओरड आहे.
तोहोगाव वनपरिक्षेत्रात सन २०१४-१५ या वर्षात ४ ते ५ लाख बांबुची तोड करण्यात आली. त्यात मजुरांना महामंडळाने ठरविलेला दर कधीही देण्यात आला नाही. यात वनाधिकाऱ्यांनी ८ ते ९ लाखांची बचत करीत मजुरांच्या घामाची मजुरी स्वत:च्या खिशात घातली. त्याचप्रमाणे सन २०१४-१५ या वर्षातील रोपवनातील दुसऱ्या निंदणीचे (विडींग) कामे करण्यात आली. मात्र तिसऱ्या विडींगची कामे न करता देयके सादर करून निधीची उचल केली. केवळ अधिकाऱ्यांना दाखविण्यासाठी दर्शनी भागात कामे केली. बाकी सर्व क्षेत्र सोडून देण्यात आले. यात लाखोची बनावट प्रमाणके सादर करून निधी हडपण्यात आला. या सर्व प्रकाराची चौकशी केल्यास मोठे घबाड हाती येण्याची शक्यता आहे.
सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात तोहोगाव वनक्षेत्रात पाच ते सहा लाख लांब बांबु, एक लाख बांबु बंडल व ५० ते ६० हजार बांबु चापाटी तोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. यात स्थानिक मजूर व परप्रांतीय मजुरांकडून काम केले जात आहे. मजुरांना शासनाच्या दरपत्रकानुसार मजुरी दिली जात नाही. परिणामी यावर्षीही मजुरांचे सर्रासपणे आर्थिक शोषण करण्याचा सपाटा वनाधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. त्याचप्रमाणे बिट कटाई, फाटे कटाई, इमारती लाकूड कटाई आदीचेही योग्य प्रकारे घनमीटर प्रमाणे दर देण्यात येत नाही. यावर्षी जंगलातील स्वच्छतेची कामे करण्यात आली नाही. तरीही त्याचे प्रमाणके बनवून निधीची उचल करण्यात आली आहे. जंगलात तोडलेल्या बांबुची वाहतूक जंगल डेपोमध्ये करायची असते. त्याच शिरओझ्याने किंवा बैलबंडीने वाहतूक करायची असते. सदर कामे मजुरांकडूनच बांबु कटाईच्या दरातच करविल्या जातात. यात मोठ्या प्रमाणात मजुरांचे शोषण होत आहे. या सर्व प्रकाराची चौकशी होणे आवश्यक आहे.
तोहोगाव वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी मु.बी. गुडपल्ले यांची बढती अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व कामाची देयके सादर करून मजुरांची लयलूट करून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व कामाची, प्रमाणकांची तपासणी झाल्यास मोठा भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना नाही, याचे नवल वाटते.
तोहोगाव वनक्षेत्रात मागील वर्षी वनाधिकाऱ्यांच्या मदतीने बांबुची कटाई न करताच ५० हजार बांबु तोडल्याची बनावट देयके सादर करण्यात आली. मात्र तो प्रकार उघड होताच त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने दुसऱ्या वनरक्षकांकडून बांबु खरेदी करून वाहतूक चालानवर खोडतोड केल्याचे समजते. तसेच कक्ष क्र. २९ मध्ये बिटाची कटाई न करताच प्रमाणके बनवून निधीची उचल केली. सदर प्रकार अंगलट येऊ नये म्हणून वाहतूक झालेली बिट निस्तारात दाखवून निस्तार बिट लोकांना विकल्याचे व त्याची रक्कम भरल्याचे समजते. परंतु अजूनही ४०० ते ५०० बिट कमी असल्याचे समजते. सदर प्रकार वनाधिकारी गुडपल्ले यांच्या मार्गदर्शनात वनपालाद्वारे करण्यात आले आहे.
तोहोगावचे वनाधिकारी मु.बी. गुडपल्ले यांचे अनेक बनावट कारनामे असून त्याच्या क्षेत्रातील प्रत्येक कामाचे प्रमाणके उच्च स्तरीय समितीकडून तपासण्यात यावे व त्या प्रमाणकानुसार मजुरांची प्रत्यक्ष तपासणी व झालेले कामे प्रत्यक्ष पाहिल्यास फार मोठी तफावत व बनावटपणा उघड होईल. त्यामुळे वनविकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: Exploitation of bamboo workers in the forest area!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.