अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांच्या श्रमदानाने विसलोन गावात शोषखड्डे
By admin | Published: June 8, 2017 12:39 AM2017-06-08T00:39:21+5:302017-06-08T00:39:21+5:30
तालुक्यातील विसलोन गावात मागील कित्येक वर्षांपासून पाणी टंचाई आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्याकरिता नेहमी पायपीट करावी लागत आहे.
भद्रावती तालुका : गावकऱ्यांचा सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : तालुक्यातील विसलोन गावात मागील कित्येक वर्षांपासून पाणी टंचाई आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्याकरिता नेहमी पायपीट करावी लागत आहे. रब्बी हंगामात पाण्याअभावी पीक घेता येत नसल्याने विसलोन येथील शेतकऱ्यांची नेहमीच आर्थिक कोंडी होत होती. यावर उपाय म्हणून गावातील पाणी गावातच मुरले तर जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होईल, याकरिता जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विसलोन गावात अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांची प्रत्येक घरात श्रमदानातून शोषखड्डे तयार करून दिले आहे.
विसलोन गावाची लोकसंख्या ६९४ असून १७१ कुटुंबे आहेत. येथील सर्वच कुटुंब शेती व्यवसाय करतात. मागील कित्येक वर्षांपासून विसलोन गावात भीषण पाणी टंचाई निर्माण होत असते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाण्याकरिता नागरिकांची चांगलीच दमछाक होत असते. जमिनीमध्येही पाणी नसल्यामुळे विसलोन येथील शेतकरी रब्बी पीक घेत नाही. गावात पाणी समस्या कायमस्वरूपी निकाली निघावी याकरिता आ. बाळू धानोरकर यांनी गावातील पावसाचे पाणी तसेच वापर झाल्यानंतर असलेले पाणी जमिनीत झिरपले पाहिजे, अशी संकल्पना अधिकाऱ्यांसमोर मांडली. अधिकाऱ्यांनी ही संकल्पना उचलून धरीत प्रत्येक घरात शोषखड्डा श्रमदानातून तयार करण्याचे ठरविले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विसलोन गावात श्रमदानातून खड्डे तयार करण्याच्या कामाला आ. बाळू धानोरकर यांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली. यावेळी संवर्ग विकास अधिकारी सुदर्शन तुपे, संवर्ग विकास अधिकारी ओमप्रकाश यादव, उपविभागीय कृषी अधिकारी एस. बी. राजवाडे, वेकोलिचे व्यवस्थापक त्रिपाठी, तालुका कृषी अधिकारी राजेश पेचे, नायब तहसीलदार काळे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेडाळू राजेश नायडू, सरपंच करुणा आगलावे, भोजराज झाडे, ग्रामपंचायत सदस्य अनिता रोडे, मनिषा निब्रड, मनोरमा बंड, ममता सूर्यवंशी, तंटामुक्त समिती अध्यक्ष संजय राजूरकर, योगेश उमरे, बंडू खापने, निळकंठ कुत्तरमारे, मनोज दानव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.