उघड्या ट्रान्सफार्मरचा नागरिकांच्या जीवाला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 06:00 AM2019-09-09T06:00:00+5:302019-09-09T06:00:46+5:30
वीज वितरण कंपनीतील अधिकारी, वायरम व कर्मचाऱ्यांकडून ग्रामीण भागातील वीज वितरण करणारी ट्रान्सफार्मर, डी.पी. तसेच तारांची दुरुस्ती याकडे फारसे गांभीर्याने बघितले जात नसल्याची स्थिती आहे. पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होऊ नये तसेच दुघर्टना घडू नये, यासाठी काळजी घेणे गरजेचे असते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: अनेक गावांत वीज तारा, खांब आणि ट्रान्सफार्मरची दुरवस्था झाली आहे. पूर्वी सार्वजनिक ठिकाणी असलेले खांब आता नागरिकांच्या घराजवळ पोहचले आहे. त्यामुळे लोंबकळणाऱ्या तारांपासून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच जंगलेले खांब आणि उघड्या असलेल्या ट्रान्सफार्मरमुळे सर्वत्र विजेच्या झटक्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
वीज वितरण कंपनीतील अधिकारी, वायरम व कर्मचाऱ्यांकडून ग्रामीण भागातील वीज वितरण करणारी ट्रान्सफार्मर, डी.पी. तसेच तारांची दुरुस्ती याकडे फारसे गांभीर्याने बघितले जात नसल्याची स्थिती आहे. पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होऊ नये तसेच दुघर्टना घडू नये, यासाठी काळजी घेणे गरजेचे असते. परंतु याकडे वीज वितरण कंपनीकडून दुर्लक्ष केले जात आहे. दुर्गम, डोंगराळ परिसरात, खेड्यात, शेतशिवारात गंजलेले खांब, दरवाजा तुटल्याने उघड्या असलेल्या डी.पी. च्या ग्रीपच्या ठिकाणी धोकादायक बांधलेल्या तारा असे काहीचे दृष्य ग्रामीण तसेच शहरी भागत दिसून येतात. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ४०-५० वर्षांपूर्वी उभ्या केलेल्या यंत्रणेवरुन वीज वितरणचा डोलारा आजही सुरु आहे. वाकलेले व अनेक वर्षांपासून सेवेत असल्याने जीर्ण झालेले खांब बदलवून त्याठिकाणी नवीन खांब बसविणे गरजेचे आहे. लोंबकळणाºया तारा वर ओढून आणि नादुरुस्त ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्याची गरज आहे. परंतु वीज वितरणचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. अनेकवेळा ग्रामीण भागात वीज संदर्भात तक्रार करूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. एवढेच नाही तर तब्बल दोन ते तीन दिवसापर्यंत अंधारात राहण्याची वेळ येते. त्यामुळे वीज वितरण कंपनीने लक्ष देवून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली जात आहे.
उघड्या डीपीतून वीज प्रवास
३० ते ४० वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या ग्रामीण भागातील डीपी बॉक्सची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या यंत्रसामग्रीला जंग चढला असून दरवाजे तुटले आहे, पेटीला भोक पडले आहे. वायर जळणे, असे प्रकार सर्रास सुरु आहे. पावसाळ्यात यावर पाणी पडल्यास विजेच्या ठिणग्या बाहेर पडून वीज प्रवाह बंद होण्याच्या प्रकारातही मोठी वाढ झाली आहे. पूर्वी गावाच्या बाहेर असलेल्या डीपी गाव विस्तारामुळे जवळ आल्याने दुर्घटना घडण्याची भिंती आहे. कृषी पंपाच्या जोडण्याची तर फार दूरवस्था आहे. सदर पोलवरुन शेतकºयांच्या पंपाला वीज पुरवठा दिला जातो. बहुतांश कृषी पंपाना वीज मिटरच लावलेली नाही. त्यामुळे याठिकाणी नेहमी दुर्घटना होण्याची भीती असते. वीज चिंतरणने शेतकºयांच्या जिवाशी खेळण्यापेक्षा या कामात सुधारणा करून दिलासा देण्याची गरज आहे.