वृद्ध वडिलांचा सत्कार करून व्यक्त केली कृतज्ञता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:32 AM2021-09-17T04:32:54+5:302021-09-17T04:32:54+5:30
१०५ वर्षीय धोंडुजी मोटघरे यांचा त्यांच्या मुलांनीच केला सत्कार लोकमत न्यूज नेटवर्क गोवरी : तालुक्यातील निंबाळा येथील भोई समाजातील ...
१०५ वर्षीय धोंडुजी मोटघरे यांचा त्यांच्या मुलांनीच केला सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : तालुक्यातील निंबाळा येथील भोई समाजातील प्रतिष्ठित नागरिक धोंडुजी गोविंदा मोटघरे यांनी वयाच्या १०५ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांच्या चारही मुलांनी सत्कार समारंभाचे आयोजन करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी सांगितले की, परमेश्वराचे रूप हे आपल्या घरातच असून, खऱ्या अर्थाने आई-वडिलांची सेवा केल्यास परमेश्वराची सेवा केल्यासारखे असते. आजच्या बदलत्या जीवनशैलीनुसार विभक्त कुटुंब पद्धतीत जीवन जगण्याकडे आजच्या पिढीचा कल वाढला असून, अशा परिस्थितीत मोटघरे भावंडे आपल्या आई-वडिलांची सेवा करत असल्याने मोठा आनंद होत आहे. यावेळी निमकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला गुलाब महाराज राठोड, ग्रामपंचायत सदस्य दीपक झाडे, साखरी येथील काशीनाथ गोरे, चिंचोली येथील माजी सरपंच अर्जुन पायपरे, गोवरी येथील लहू बोरकुटे, पोलीस पाटील पाल, माजी पोलीस पाटील सुरेश उरकुडे, महादेव मेश्राम, विठ्ठल पाल, जनार्दन मोटघरे, साईनाथ शेरकी, मधुकर मोटघरे, भिवसन मोटघरे, रामचंद्र मोटघरे आदी उपस्थित होते.