गरिबांपर्यंत आयुष्यमान योजनेचा लाभ पोहोचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:54 AM2019-01-11T00:54:26+5:302019-01-11T00:54:51+5:30
‘सर्वांसाठी आरोग्य’ या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रधानमंत्र्यांनी सुरु केलेली आयुष्यमान भारत ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. गरिबांना आयुष्यमान योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंंद्रपूर : ‘सर्वांसाठी आरोग्य’ या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रधानमंत्र्यांनी सुरु केलेली आयुष्यमान भारत ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. गरिबांना आयुष्यमान योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. ग्रामपंचायत सेतू केंद्रातील कर्मचाऱ्यांचा सत्कार तसेच कार्यशाळेत ते बोलत होते.
यावेळी महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. बी. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, विजय राऊत, मनपा स्थायी समितीचे राहुल सराफ आदी उपस्थित होते.
आपले सरकार सेवा केंद्राच्या वतीने जिल्ह्यातील १६ लोकांना या योजनेअंतर्गत गोल्ड कॉर्ड वाटप करण्यात आले. या योजनेचा लाभ घेतलेल्या काही लाभार्थ्यांचा प्रातिनिधीक सत्कार ना. अहीर यांच्या हस्ते करण्यात आला. आयुष्यमान ना. अहीर म्हणाले, भारत ही योजना आरोग्याशी संबंधित असणारी विमा योजना आहे. याअंतर्गत गरीबी रेषेखालील व अन्य सर्व जनतेला ६६१ आजारांसाठी विमा कवच बहाल करण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत ५ लाखांपर्यंत उपचारासाठी मदत केली जाणार आहे.
यासाठी प्रत्येक गावामध्ये सीएससी सेंटर उभारण्यात येणार आहे. सेतू केंद्र व ग्रामपंचायतमधून नोंदणी केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी यावेळी दिली. जिल्ह्यातील २ लाख ७४ हजार कुटुंबान्ाां यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. १० ते १२ लाख नागरिकांना याचा फायदा मिळणार आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्रात चंद्रपूर व नाशिक जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे.
कार्यक्रमाप्रसंगी सीएससीचे महाराष्ट्र प्रमुख समीर पाटील, प्रकल्प प्रमुख निलेश कुंभारे, जिल्हा प्रबंधक रमजान शेख, अनिरूद्ध डहाके, स्वप्नील सोनटक्के व संबंधित विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. संचालन उद्धव पुरी यांनी केले.
विम्याचे कवच
जिल्ह्यात १ जानेवारीपासून आयुष्यमान योजनेचा शुभारंभ झाला आहे. ही योजना दुर्गम, आदिवासी भागातील बांधवांसाठी उपयोगाची ठरणार आहे. महाराष्ट्रात या योजने सोबतच महात्मा फुले जन आरोग्य योजनाही एकत्रित राबविली जाणार आहे. लोकांना आरोग्य विम्याचे कवच मिळणार आहे. जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायत व सेतू केंद्रातील केंद्रचालकांनी उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.